ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे यंदा सातवे वर्ष. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या मोहिमेच्या नाशिक विभागातील कामगिरीचा वेध मालिकेद्वारे घेण्यात येत आहे. मालिकेतील पंचविसावा लेख.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत आपापसांतील वादाचे पर्यवसान भांडणात होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. ग्रामीण भागात अवैध धंद्यांवर याद्वारे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील अवैध धंदे केवळ तंटय़ांचे नव्हे, तर गावातील वातावरण बिघडविण्यास कारक ठरते. बेकायदेशीर मद्यविक्री, मटका वा जुगारांसारख्या प्रकारांमध्ये गुरफटल्याने अनेक कुटुंबे देशोधडीला लागल्याची उदाहरणे आहेत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मोहिमेत अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या काही वर्षांत नाशिक परिक्षेत्रातील काही गावांनी दारूबंदीचे ठराव करून या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले आहे.
बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या या व्यवसायांमुळे गावातील वातावरण बिघडते. अनेकदा दारूच्या गुत्यावर मद्यपींमध्ये अंतर्गत वाद होतात. दुसरीकडे मटका वा जुगाराकडे आकर्षित होणाऱ्यांची गावात कमतरता नसते. झटपट जादा पैसे कमविण्याच्या नादात ही मंडळी स्वत:जवळ आहे ते सारे विकून मोकळी होतात. परिणामी, संबंधितांच्या संपूर्ण कुटुंबीयांची वाताहत होते. अवैध धंद्यांमुळे गावातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पाश्र्वभूमीवर, शासनाने तंटामुक्त गाव मोहिमेची संकल्पना मांडताना त्याचा गांभीर्याने विचार केल्याचे लक्षात येते. तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी झालेल्या गावांना गावात तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे बंधनकारक आहे. त्या अंतर्गत अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे निर्मूलन करणे या निकषाला १५ गुण देण्यात आले आहे. गावातील अवैध धंदे रोखण्यासाठी ग्रामसभा महत्त्वपूर्ण ठरते. गावात मद्यपींचा धुडगूस थांबविण्यासाठी ग्रामसभा दारूबंदीचा निर्णय घेऊ शकते. या निर्णयानुसार तंटामुक्त गाव समिती पोलीस यंत्रणेच्या मदतीने या धंद्यांवर नियंत्रण मिळवू शकते. मटका, जुगार वा तत्सम अनधिकृत धंद्यांना गावात थारा मिळणार नाही, याची दक्षता तंटामुक्त गाव समितीने घेणे अभिप्रेत आहे. अवैध धंदे करणाऱ्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्यासाठी प्रयत्न करणे, गावात व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवून व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्यांना समुपदेशन करणे, असे विविध कार्यक्रम राबवून अनेक गावांनी शांततेचे वातावरण निर्माण करण्यास पुढाकार घेतला आहे.