आठवडाभर सुरू असलेल्या पावसाची रिपरिपीमुळे उत्तम दर्जाच्या झेंडूच्या फुलांची आवक यावेळी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे असले तरी दसऱ्याच्या मुहूर्तावर रस्ते आणि बाजार फुलांनी भरून गेले आहेत. पिवळ्या झेंडूच्या तुलनेत यावेळी केशरी फुलांचे प्रमाण मात्र कमी आहे.
भारतीय संस्कृतीतील कोणताही सण फुलांशिवाय साजरा होऊ शकत नाही. साडेतीन मुहूर्तापकी एक असलेल्या दसऱ्यासाठी दादर आणि बोरिवलीचा बाजार झेंडूच्या फुलांनी फुलला आहे. दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर घरांना झेंडूच्या फुलांची तोरणे लावण्यासाठी वाढणाऱ्या मागणीसाठी तीन दिवस आधीपासूनच व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांची तयारी सुरू आहे. रस्त्याकडेला, फुटपाथवर, मोकळी जागा मिळेल तिथे झेंडूंच्या फुलांचा पसारा आणि त्यात तोरणे गुंफत बसलेली मुले-बाया नजरेला पडत आहेत.
मुंबईत पुणे ते कोल्हापूर पट्टय़ातून झेंडूच्या फुलांची आवक होते. दसऱ्याला फुले मिळावीत यासाठी गणपतीनंतर लागवड केली जाते. सप्टेंबरमध्ये फारसा पाऊस नसल्याने सुरुवातीला उत्तम आलेल्या झेंडूच्या पिकांना नवरात्रीतील पावसाच्या सरी मारक ठरल्या आहेत. त्यामुळे उत्तम प्रतीचा झेंडू यावेळी कमी आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पहिल्या प्रतीचा झेंडू ३० टक्के, दुसऱ्या प्रतीचा झेंडू ४० टक्के तर उर्वरित माल तिसऱ्या प्रतीचा आहे, असे दादर फुलबाजारातील व्यापारी सोपान दुराफे यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी घेतलेल्या पिकातील उरलेला मालही यावेळी मिसळला गेला आहे. त्याचप्रमाणे पिवळ्या झेंडूच्या तुलनेत केशरी झेंडूचे प्रमाण कमी आहे. घाऊक बाजारात तिसऱ्या प्रतीच्या झेंडूची किंमत ३०रुपये किलो तर दुसऱ्या प्रतीच्या झेंडूंची किंमत ५० रुपये सुरू आहे. पहिल्या प्रतीसाठी ६० ते ६५ रुपये मोजावे लागत आहेत. किरकोळ बाजारात पावसामुळे थोडी खराब झालेली तसेच पाच सहा दिवस आधी आलेली झेंडू फुले ८० रुपये किलोने विकली जात आहेत. दुसऱ्या प्रतीचा झेंडू १२० रुपये किलोने मिळत आहे. झेंडूंच्या तयार तोरणांच्या किंमती ४० पासून ८० रुपयांपर्यंत जात आहेत. शेंवतीची आवक गणेशोत्सवात कमी झाली असली तरी अहमदनगरहून आलेल्या शेवंतीने यावेळी ग्राहकांना हात दिला आहे. झेंडूच्या जोडीने नवरात्रात शेवंतीच्या वेण्यांनाही मागणी आहे.
झेंडूच्या फुलांसोबतच आंब्याच्या पानांनीही बाजारात जागा पटकावली आहे. फुलांची तोरणे पानांशिवाय पूर्ण होऊ शकत नसल्याने दसऱ्याला आंब्यांच्या पानांनाही उठाव असतो. कर्जत-कसाऱ्याहून आणि वसई- विरार- डहाणूपासून आंब्यांची पाने दादर व बोरिवलीच्या बाजारात आली आहेत. आपटय़ाच्या पानांची आवक शुक्रवार रात्रीपासून होण्यास सुरुवात झालेली असून रविवार सकाळपर्यंत हा बाजार तेजीत असेल.