गणपती- नवरात्रीचे दिवस मुंबईकरांसाठी लांबचलांब रांगांचे दिवस असतात. सर्वसामान्य लालबाग, परळला जाऊन तासन्तास रांगेत उभे राहतात. परंतु यंदा या गणेशभक्तांना दोनदोन रांगांचे ‘सुख’ अनुभवण्यास मिळत आहे. गणेशदर्शनाच्या ओढीने निघालेल्या हजारो भक्तांना तिकीट काढण्यासाठी मोठमोठय़ा रागांमध्ये आपल्या ‘भक्तीची परीक्षा’ द्यावी लागत आहे. याचे साधे कारण आहे रेल्वे स्थानकांवरील बंद पडलेली एटीव्हीएम मशीन्स!
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागातील गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळत असून कल्याण-डोंबिवलीतून मुंबईमध्ये गणेशदर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे तर मुंबईहून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथील नातेवाईकांकडे गणेशदर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दीही या उत्सवकाळात वाढलेली आहे. कुटुंबकबिल्यासह गणेशदर्शनासाठी निघालेल्या या गणेशभक्तांना उपनगरीय रेल्वे सेवेच्या ‘स्मार्टकार्ड’च्या साहाय्याने तिकिटे काढून वेळ वाचवण्याकडे कल असतो. मात्र स्थानकात पोहचल्यानंतर बंद एटीव्हीएम मशीन्सचा सामना या मंडळींना करावा लागत आहे. अनेक स्थानकातील मशीन्स बंद तर चालू मशीन्सचा ताबा तिकीट काढून देणाऱ्या मदतनिसांनी घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे समान्य प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी मदतनिसांच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागते. अन्यथा भलीमोठी रांग लावून तिकीट काढावे लागते.

उत्सवांच्या काळात एटीव्हीएम यंत्रणा कार्यान्वित हवी..
उत्सवांच्या काळातील प्रवाशांची गर्दी साधारणपणे नेहमीसारखी ‘सराईत’ नसते तर ‘नवखी’ असते. अर्थात नेहमी प्रवास न करणाऱ्यांची संख्या या काळात जास्त असते. शिवाय त्यात महिला आणि मुलांची संख्या खूप असते. स्वाभाविकच तिकिटांना मोठी मागणी असते. त्यामुळे या प्रवाशांना कोणतीही अडचणी न येण्याची खबरदारी रेल्वे प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. उत्सवाच्या काळात रेल्वे प्रशासानाने त्यांच्या यंत्रणा दक्ष ठेवण्याची गरज असून बंद एटीव्हीएम मशीन्स तात्काळ कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष राजेश घनघाव यांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी मोठय़ा रांगांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तिकीट काढताना रांग नको म्हणून ‘स्मार्ट कार्ट’ काढून तिकिटे काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र येथे एटीव्हीएम मशीन्स बंद असल्याने तिकीट खिडक्यांवर रांगा लावणे व त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी रांगा अशा दोन वेळा रांगा लावाव्या लागत आहेत.