जिल्ह्यात इंडिया बुल्ससह वेगवेगळ्या प्रश्नांवर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या ज्या शेतकरी वा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, ते सर्व गुन्हे मागे घेण्याची विनंती आ. जयंत जाधव यांनी केल्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहे.
विधान परिषदेत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षाने चर्चा उपस्थित केली होती. यावेळी आ. जाधव यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. काही वर्षांपूर्वी भगूर येथील एका दुर्दैवी घटनेत प्रियंका लकेरिया या शाळकरी मुलीचे अपहरण करून तिला जिवे मारण्यात आले. या घटनेतील आरोपीला निर्दोष ठरविण्यात आले. या मुलीचे पालक, नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी संशयितांना पकडण्यासाठी आंदोलने केली होती. या गुन्ह्याच्या तपासात यंत्रणा कमी पडली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आंदोलने करणारे पालक व नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. सिन्नर तालुक्यातही इंडिया बुल्स व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात वादंग निर्माण झाले. गुळवंच येथे घडलेल्या प्रकरणात आणि नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक या गावी घडलेल्या आंदोलनात जे गुन्हे दाखल झाले, ते मागे घेण्याची मागणी आ. जाधव यांनी केली. या प्रश्नास उत्तर देताना गृहमंत्र्यांनी संबंधितांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आ. जाधव यांनी इतरही काही प्रश्न मांडले. नाशिक जिल्ह्यात इमू पालन व्यवसायाच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले. त्या संदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित झाली असता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या चौकशीबाबत कोणती प्रगती झाली हे सभागृहाला कळणे आवश्यक आहे. नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत. पोलिसांनी घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अशा घटना घडणार नाही याबाबत सतर्क राहिले पाहिजे, असेही आ. जाधव यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित असून त्यावर त्वरित निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली.