पावसाळा सुरू होईपर्यंत पालिकेने सध्या उपलब्ध पाणीसाठा नळाव्दारे सध्याच्या व्यवस्थेत पुरविण्याचे नियोजन केले असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी केले आहे.
शहरास भेडसावणारी पाणी टंचाई आणि यानिमित्ताने होणारी वेगवेगळी चर्चा या पाश्र्वभूूमीवर नगराध्यक्षांनी पालिका सभागृहात  पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. काही दिवसांपासून शहरात पाणी केव्हा मिळेल याची शाश्वती नाही असे चित्र उभे करून चुकीची माहिती देण्यात येत आहे. लोकांमध्ये अफवा पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व काही चुकीचे असल्याचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी या वेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बब्बुभाई कुरेशी, पाणी पुरवठा विभागाचे सभापती प्रमोद पाचोरकर, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, बबलू पाटील, महेंद्र शिरसाठ, गौतम संचेती आदी उपस्थित होते. शहराच्या बिकट पाणीपुरवठा परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री तसेच आमदारांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाकडन प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्य शासन व पालिकेने पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी  अनेक उपाययोजना केल्या आहेत.
फेब्रुवारी अखेपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा सध्या उपलब्ध असून मार्च महिन्याचेही आवर्तन शहरासाठी मिळणार आहे.
त्यानंतर जूनमध्येही मिळेल. याशिवाय नळ पाणी पुरवठय़ाव्यतिरिक्त खासगी विहिरी अधिग्रहीत करणे, टँकरने पाणी पुरविणे व कूपनलिका आदींसाठी तीन कोटी ४० लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष पगारे यांनी दिली.