विदर्भातील वेगवेगळ्या २३ ठिकाणच्या प्राचीन स्थळांना शासकीय संरक्षण देण्याची मागणी सत्य शोधन समिती संशोधन समूहाने केली आहे. विदर्भाला वैशिष्टय़पूर्ण ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
भगवान बुद्ध, भगवान महावीर, सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन, वाकाटक, सातवहन, कॉलीन एज्युकेशन सेंटर, लेण्या, ज्ञानागार गुंफा, स्तुप चैत्य शिलालेख, बाहुली विहीर, भोसले कालीन गड किल्ले, जंगल-पर्वतावर दुर्लक्षित अवशेष या प्राचीन मध्ययुगीन इतिहास संदर्भ प्राप्त स्थलांवर सत्य शोधन समिती संशोधन समूहामार्फत केल्या कित्येक दिवसांपासून स्थळाला भेट देऊन संशोधन केले जात आहे. या प्राचीन वास्तूंच्या जीर्ण अवस्थेमुळे उद्विग्न होऊन समितीने भारत सरकार केंद्रीय आर्किओलॉजीच्या नागपूर विभागीय कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागीय कार्यालयाला निवेदन दिले.
नागपूर जिल्ह्य़ातील १३ स्थळ, भंडारा जिल्ह्य़ातील तीन स्थळ आणि चंद्रपुरातील सहा स्थळांचा संदर्भ देऊन पुरातत्त्व अधिकाऱ्यांबरोबर दीर्घ चर्चा केली. या ऐतिहासिक संशोधन स्थळांवर शासकीय पुरातत्व सूचना फलक लावावे, त्यांचे शास्त्रीयरित्या उत्खनन करण्यात या मागणीचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देणाऱ्यांमध्ये मुख्य संयोजक धर्मेश पाटील, भंडारा जिल्हा संयोजक सुरेश अलोणे, चंद्रपूर जिल्हा संयोजक शेषराव खोब्रागडे, नागपूर जिल्हा संयोजक प्रशांत गायकवाड, संजय खांडेकर, महेंद्र लोखंडे, संदीप खडसंग, परमानंद मेश्राम, संजय भारतीय आणि संजय मोरे आदींचा समावेश होता.