लग्नासाठी दागदागिने, कपडे या गोष्टींची तयारी केली म्हणजे सासू-सासरे होण्यास सज्ज झालो हा गैरसमज आहे. वेगळय़ा संस्कारात वाढलेली एक मुलगी आता आपल्या घरात येणार असून तिला सामावून घेण्यासाठी काही तडजोडी करण्याची मानसिक तयार हवी, असा सल्ला विवाह समुपदेशक व ‘अनुरूप विवाह संस्थे’च्या गौरी कानिटकर यांनी दिला आहे.
‘लोकसत्ता जीवनसाथी’ आणि ‘अनुरूप’तर्फे घेण्यात आलेल्या ‘सासू-सासरे होताना’ या अभिनव उपक्रमात त्या बोलत होत्या. आरंभी सासू-सासरे होताना भीती वाटते काय?, ‘लग्न’ या विषयावर मुला-मुलींशी संवाद होतो काय? स्थळे शोधण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची? असे प्रश्न श्रोत्यांपुढे मांडण्यात आले. त्यावर मुलींच्या वाढत्या अपेक्षा, चांगली सून म्हणजे लॉटरी व चांगला जावई म्हणजे भाग्य, सुनेच्या विपरीत वागण्याबद्दल बोलण्याची चोरी झाली आहे, असे विविध विचार उपस्थितांनी मांडले.
काही वर्षांपूर्वी तडजोड करायची ती सुनेने, असे गृहीतक होते. पण आजकालच्या सुना अशी तडजोड करणाऱ्या नाहीत, याचे भान सासू-सासऱ्यांनी ठेवावे व आपल्यातही आवश्यक बदल करावेत. मुलांनाही काही करून खाता येईल, इतका स्वयंपाक शिकवणे हे पालकांचे काम आहे, असे कानिटकर यांनी सांगितले.
स्थळे निवडण्याची प्राथमिक जबाबदारी मुला-मुलींवर टाका, आठवडय़ात किमान एक दिवस तर एक तास मोबाइल, टीव्ही बंद ठेवून गप्पा माराव्यात, एकत्र जेवण घ्यावे. आणि मुला-मुलींनी मदत मागितली तरच द्यावी अनाहूत सल्ले, मदत देऊ नये, असे मार्गदर्शन ‘अनुरूप’चे महेंद्र कानिटकर यांनी केले.