साडेचार महिन्यावर आलेली नवी मुंबई पालिकेची सार्वत्रिक निवडणूक नजरेसमोर ठेवून नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना फैलावर घेण्याचा सपाटा लावला असून आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्यावर जरब बसविण्याची खासदार-आमदारांची अहमहमिका सुरू आहे.  पालिकेचे आयुक्त राहिलेले शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना पालिकेचा कारभार चांगलाच माहीत असल्याने त्यांची आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. त्यामुळे पालिका नको, पण लोकप्रतिनिधी आवरा असे म्हणण्याची वेळ आयुक्तांवर आली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर नवी मुंबईतील राजकारण ढवळून निघाले आहे. काल-परवा राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या शहरात आता खासदार राजन विचारे हे शिवसेनेचे तर बेलापूर मतदार संघातील आमदार मंदा म्हात्रे या भाजपच्या आणि ऐरोलीचे आमदार संदीप नाईक हे राष्ट्रवादीचे असे तीन वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. बेलापूर जिंकल्याने भाजपच्या मंदा म्हात्रे यांचा आत्मविश्वास ओसंडून वाहत आहे. नाईक यांना पाडण्याचा त्यांनी विडा उचलला होता. पालिकेवर सत्ता प्रस्थाापित करण्याच्या प्रयत्नातील एक भाग म्हणून मंदा म्हात्रे यांनी आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांना फैलावर घेतले. पालिकेत सुरू असलेली पाच टक्के टक्केवारी प्रथम बंद करा असे आदेशच त्यांनी आयुक्तांना दिले. त्यासाठी शहरातील समस्यांच्या जागांना भेटी दिल्या. हे वादळ शमते न्् शमते तोच शिवसेनेच खासदार आपल्या सेनास्टाईलने उपनेते, जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचा फौजफाटा घेऊन आयुक्तांवर बरसले. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांनी आयुक्तांना ‘अधिकारी, ठेकेदारांचे लाड पुरे करा’ असे सुनावले. शहरात निर्माण झालेल्या आरोग्याचा प्रश्न घेऊन हे सर्वजण आयुक्तांना भेटले खरे, पण आरोग्यापेक्षा आयुक्तांवर समस्यांची फवारणी करताना जवळ आलेल्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे संकेत हे नेते देत होते.
पालिकेत सध्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. अर्धशतकापेक्षा जास्त नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. त्यात फूट पडण्याची शक्यता निश्चित आहे. त्यामुळे राज्यात भाजपने वापरलेला फॉम्र्युला या ठिकाणी वापरला जाणार असून राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडून पालिकेत सत्ता आणण्याची स्वप्ने पूर्ण केली जाणार आहेत. शिवसेनाही गेली १५ वर्षे पालिकेच्या सत्तेपासून दूर आहे. माजी मंत्री गणेश नाईक हे शिवसेनेत असताना त्यांनी पालिकेवर पहिला भगवा फडकविला होता. त्यानंतर शिवसेनेची मजल २० नगरसेवकांच्या वर गेली नाही. त्यामुळे येनकेनप्रकारेण नवी मुंबईत शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी खासदार विचारे, जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि उपनेते विजय नाहटा यांनी कंबर कसली आहे. तीन वेळा पराभवाचे चटके सहन केलेल्या चौगुले यांची आता महापौर होण्याची इच्छा बाकी आहे. त्यासाठी राज्यात न झालेली शिवसेना-भाजप युती येथे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाईक यांच्या हातून खासदारकी व आमदारकी गेल्याने आता पालिकेची सत्ता टिकविण्याचे फार मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ऐरोली विधानसभा निवडणुकीची एकटय़ाने व्यूहरचना रचून दणदणीत विजय मिळवलेल्या आमदार नाईक यांच्यावर पालिका निवडणुकीची सूत्रे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. सत्ता काबीज करण्यासाठी सुरू असलेले हे राजकारण सध्या अधिकाऱ्यांच्या जिवावर आले आहे. त्याचे पहिले बळी आयुक्त आबासाहेब जऱ्हाड हे आहेत. त्यांच्यावर सर्वच पक्षांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी सर्वत्र डोके वर काढले आहे. लोकप्रतिनिधी उपाययोजना सुचवत असून त्यानिमित्ताने लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यांनी केलेल्या सूचनांची अमंलबजावणी करण्याचे काम प्रशासन करीत आहे. सध्या कसोटीचा काळ असून प्रशासन त्याचा समर्थपणे सामना करीत आहे.
आबासाहेब जऱ्हाड,
आयुक्त , नवी मुंबई
महानगर पालिका