दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार : रामराजे नाईक निंबाळकर

मेळाव्यातही भूमिका स्पष्ट केली नाही

विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी सोडण्याच्या मार्गावर आहेत. “सातारा जिल्ह्याची राजकीय संस्कृती वेगळी आहे. ती टिकवण्यासाठी पक्षाबाहेर जाऊन विचार करेल आणि येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करू,” असे सांगत रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले आहेत.

नेत्यांच्या गळतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चर्चेत आहे. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यापाठोपाठ विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहे. एबीपी माझा वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचे संकेत दिले आहेत. रामराजे निंबाळकर म्हणाले,”माझ्या प्रवेशाविषयी गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू आहे. मी याबाद्दल काहीही बोललेलो नाही. जिल्ह्याच राजकारण आणि तालुक्याच राजकारण वेगळं असतं. संस्थान काळापासून फलटणचं राजकारण वेगळं आहे. माझे आजोबा पहिल्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी केलेल्या कामांच्या आमच्यावर प्रभाव आहे. राष्ट्रवादी सोडणार की नाही, याविषयी काहीही बोललो नाही. उदयनराजेंनी पक्षप्रवेश माझा थांबवला हे मला वाटत नाही. पवार साहेबांनी सोनिया गांधींशी केलेलं बंड आम्हाला आवडलं होते. दिल्लीशी वाद घालणं आम्हाला नेहमी आवडलेलं आहे. मी जिल्ह्यापुरत बघतो. राजकीय संस्कृतीने परिपूर्ण असलेला हा जिल्हा आहे. ही परंपरा टिकवावी लागेल. त्यासाठी पक्षाबाहेर जाऊन विचार करावा लागला, तरी  मी करेल,” असं सांगत रामराजे नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादी सोडण्याची सुतोवाच केले आहेत.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वी फलटण येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला होता. मागील अनेक दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजपा किंवा शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली आहे. त्या मेळाव्यात रामराजे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र त्यांनी याबाबत काहीही भूमिका स्पष्ट केली नव्हती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ramraj naik nimbakar says ill announce my decision next two days bmh

ताज्या बातम्या