‘रुग्णालयांवर कारवाई करा – राज्यमंत्री तनपुरे

नगर : रेमडेसिविर इंजेक्शनचे जिल्हा प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांना वितरण केले जाते. त्यामुळे या इंजेक्शनच्या वापराचा हिशोब रुग्णालयांना द्यावाच लागेल. याबाबत सहकार्य न करणाऱ्या रुग्णालयांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारावा, अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना केली आहे.

राज्यमंत्री तनपुरे यांनी आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टरांच्या ‘ईमा‘ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर या संदर्भातील माहिती तनपुरे यांनी पत्रकारांना दिली.

ते म्हणाले, महापालिकेने प्रत्येक रुग्णालयाच्या बिलाची तपासणी करण्यासाठी ‘ऑडिटर‘ नियुक्त केले आहेत. या ऑडिटरवरच रेमडेसिविर इंजेक्शनच्या योग्य वापरायच्या हिशोबाची जबाबदारी दिली आहे. यासाठी सहकार्य न करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावून कायद्याचा बडगा उगारण्याची सूचना आपण आयुक्तांना केली आहे.

रेमडेसिविर रुग्णांच्या नातेवाईकांना काळ्याबाजारात विकत घ्यावे लागते यासारखे दुर्दैवी परिस्थिती नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

खासगी रुग्णालयांनीही प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प रुग्णालयाच्या आवारात सुरू करावेत, यासाठी डॉक्टरांच्या संघटनेने काही नियमात शिथिलता आणण्याची मागणी केली आहे. त्यांना कोणत्या प्रकारची सवलत हवी आहे, याबाबत आपण लेखी निवेदन करण्यास संघटनेला सांगितले आहे. ते प्राप्त झाल्यानंतर आपण मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यासाठी प्रयत्न करू, असेही आश्वासन तनपुरे यांनी दिले. शहरात संचारबंदी व टाळेबंदी असूनही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत, याकडे लक्ष वेधले असता जिल्हा प्रशासन व आपणही याकडे लक्ष ठेवून आहोत, असे त्यांनी सांगितले.

निकालाचे चिंतन करू

पंढरपूर निवडणुकीत राज्य सरकारचे काम व भालके यांच्या सहानभुतीमुळे यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही, याबद्दल आम्ही चिंतन करूच, परंतु हा निकाल म्हणजे राज्य सरकारचे अपयश नाही. एका जागेसाठी ही निवडणूक होती. तसा संदर्भ जोडला तर पश्चिम बंगालमधील पराभव हा मोदी सरकारच्या कारभाराचे अपयश मानायचं का, असा प्रश्नही राज्यमंत्री तनपुरे यांनी उपस्थित केला.

लसीकरणातील सुसूत्रतेसाठी प्रयत्न

लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यतील दोन—तीन तालुक्यात गावोगाव जाऊन लसीकरणासाठी नागरिकांना माहिती दिली जाईल. त्यांना कोणती लस हवी, यासाठी यादी केली जाईल. त्यानुसारच त्यादिवशी लसीकरणासाठी नागरिक बोलावले जातील. त्यामुळे गर्दी व केंद्रावरील त्यांच्या चकरा टाळता येतील. यासाठी प्रयत्न असल्याची माहिती राज्यमंत्री तनपुरे यांनी दिली.