राष्ट्रीय छात्र सेनेचा (एनसीसी) ऑल इंडिया बेस्ट कॅडेट होण्याचा बहुमान यावर्षी नगर महाविद्यालयाच्या पुष्पेंद्रसिंग याला मिळाला. दिल्ली येथे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते त्याला यासाठीचे सुवर्णपदक व चषक देण्यात आला.
पंतप्रधान ध्वजाचा मानही यावेळी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राला मिळाला. त्यात पुष्पेंद्रसिंगच्या या सुवर्णपदकाचा मोठा वाटा आहे. दिल्लीत देशभरातून आलेल्या त्यात्या राज्याच्या बेस्ट कॅडेटमध्ये विविध स्तरावर परीक्षा होऊन त्यात उत्कृष्ट ठरणाऱ्या
छात्राला ऑल इंडिया बेस्ट कॅडेट चा बहुमान दिला जातो. महाराष्ट्राचा बेस्ट कॅडेट असलेल्या पुष्पेंद्रसिंग याने या सर्व कसोटय़ा पार करत सुवर्णपदकावर स्वत:चे,
महाराष्ट्राचे व नगर महाविद्यालयाचे नाव कोरले.
हा मान मिळवणारा पुष्पेंद्रसिंग जिल्ह्य़ातील पहिलाच छात्र आहे. स्पर्धेतील संचलन, वर्ड ऑफ कमांड, एनसीसीचा अभ्यासक्रम, सामान्यज्ञान, तोंडी मुलाखत या सर्व प्रकारात त्याने बाजी मारली व नगर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
नगरच्या १७ महाराष्ट्र बटालियनचा तो छात्र आहे. त्याला बटालियनचे प्रमुख कर्नल
के. एस. मारवा, तसेच नगर महाविद्यालयाचे एनसीसीचे प्रमुख मेजर शाम खरात यांचे मार्गदर्शन मिळाले.
बी.पी. एच सोसायटीचे सचिव फिलीप बार्नबस, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस, एनसीसीच्या महाराष्ट्र विभागाचे उपमहानिदेशक मेजर जनरल एस. सेन. गुप्ता, औरंगाबाद विभागाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर ए. जे. ढोबळे यांनी पुष्पेंद्रिंसंगचे या यशाबद्धल अभिनंदन केले आहे.