ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील बँकांच्या एटीएम सेंटरमधील सुरक्षेचा आढावा घेण्याचे काम ठाणे पोलिसांनी सुरू केले असून या एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षारक्षक नेमण्यात हयगय करणाऱ्या बँकांच्या व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
नौपाडा येथील गोखले रोडवरील महाराष्ट्र बँकेसमोर ज्येष्ठ नागरिकांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या स्वतंत्र वाहनतळ सुविधेचा शुभारंभ मंगळवारी आयुक्त रघुवंशी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक रणजित, पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वेगवेगळ्या बँकांची सुमारे ६४२ एटीएम सेंटर असून त्यामधील सुरक्षा व्यवस्थेसंबंधी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे, तसेच एटीएम सेंटरमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आणि सुरक्षारक्षक नेमावेत, या संबंधी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चाही सुरू आहे. मात्र, यासंबंधी बँक व्यवस्थापनाला सूचना देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना मुंबई पोलीस कायद्यानुसार नोटीस पाठविण्यात येईल आणि त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही रघुवंशी यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांशी संवाद..
ठाणे वाहतूक पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र वाहनतळ सुविधा सुरू केल्याबद्दल नौपाडय़ातील गोखले रोडवरील महाराष्ट्र बँकेमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आयुक्त रघुवंशी यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र वाहनतळ सुविधा दिली, म्हणजे आम्ही फार मोठे काही काम केले असे होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना आधाराची गरज असते. त्यामुळेच वेगवेगळ्या कारणांसाठी बँकांमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी ही सुविधा सुरू केली आहे, असे ते म्हणाले. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी अथवा काढण्यासाठी जात असता. त्यावेळी थोडी काळजी घ्या. आजूबाजूला पाहा, तुमच्यावर कोणी नजर ठेवत आहे का, याची चाचपणी करा. तुमचा कोणी पाठलाग करत आहे का याविषयी सजग राहा, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.

काळानुरूप बदलण्याची गरज..
शहरातील व्यवसाय करणे म्हणजे प्रत्येक दिवशी उत्पादन करणे हे व्यवसाय टिकवण्यासाठी महत्त्वाचे ठरू लागले आहे. भाडय़ाने घेतलेली दुकाने बंद ठेवल्यास दुकानदारांना तोटाच होत होता. शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी सुरू झालेले मॉल कधीही बंद नसल्याने व्यावसायिकांसमोर त्यांची मोठी स्पर्धा निर्माण करत होती. त्यामुळेच ठाण्यात घेतली जाणारी सोमवारची सुट्टी पाळणे व्यावसायिकांना आर्थिकदृष्टय़ा कठीण जात आहे, अशी माहिती गोखले मार्गावरील एका ज्येष्ठ व्यापाऱ्याने दिली. कायद्यानुसार जीवनावश्यक सेवांना आठवडय़ाच्या सुट्टीतून वगळण्यात आले आहे. मात्र हा कायदा केवळ स्थानिक व्यावसायिकांसाठीच असल्याने त्यांना मॉल्स आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आपला व्यवसाय खुलेआमपणे करत असल्याने हे स्थानिक कायदे व्यापाऱ्यांची गळचेपी करणारेच आहेत. त्यामुळे सर्व व्यवसायिकांना समान कायदे असणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे व्यापारी उद्योग महासंघाचे उपाध्यक्ष मुकेश सावला यांनी दिली.