scorecardresearch

स्तनांचा कर्करोग जनजागृतीनिमित्तच्या शर्यतीला उत्स्फूर्त सहभाग

स्तनांचा कर्करोग याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या धावण्याच्या शर्यतीला लोकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. भारतात दरवर्षी एक लाख १५ हजार महिलांना स्तनांचा कर्करोग होतो. २०१५ सालापर्यंत ही संख्या दोन लाख ५० हजापर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्तनांचा कर्करोग जनजागृतीनिमित्तच्या शर्यतीला उत्स्फूर्त सहभाग

स्तनांचा कर्करोग याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या धावण्याच्या शर्यतीला लोकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. भारतात दरवर्षी एक लाख १५ हजार महिलांना स्तनांचा कर्करोग होतो. २०१५ सालापर्यंत ही संख्या दोन लाख ५० हजापर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्तनांच्या कर्करोगाचे निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यात झाले तर पूर्ण बरा होणारा हा आजार आहे, म्हणूनच त्याविषयी जनजागृती करणाऱ्या मोहिमेत आपण सहभागी झाल्याचे अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण याने रविवारी पिंकेथॉन शर्यतीत सहभागी झाल्यानंतर सांगितले.
स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी टाटा स्मृती रुग्णालय आणि वुमेन्स कॅन्सर इनिशिएटिव्ह या संस्थांच्या वतीने रविवारी वांद्रे-कुर्ला संकुलात दहा किलोमीटर धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमणसह अनेक जण सहभागी झालेल्या या शर्यतीला अभिनेत्री करिष्मा कपूर हिने हिरवा झेंडा दाखविला. जवळपास दोन हजार महिलांनी या शर्यतीत सहभाग घेतला. दहा किलोमीटर अंतर धावण्याच्या या शर्यतीत किरण तिवारी ही विजेती ठरली. तर अनुक्रमे पाच आणि तीन किलोमीटरच्या शर्यतीत मयूरी सुतार आणि निकिता इंगळे या स्पर्धक विजेत्या ठरल्या.
पिंकेथॉन इंटरनॅशनल वुमेन्स दहा किलोमीटर शर्यतीतून मिळालेला निधी स्तनांचा कर्करोगविषयक काम करणाऱ्या देविका भोजवानी यांच्या वुमेन्स कॅन्सर इनिशिएटिव्हसाठी वापरला जाणार आहे. दरवर्षी पिंकेथॉन शर्यत भरविण्यात येणार असून देशातील प्रमुख दहा शहरांमध्येही अशा शर्यतींचे आयोजन करण्यात येणार असल्याचे देविका भोजवानी यांनी सांगितले.
रविवारच्या शर्यतीच्या वेळी महिला व बालकल्याण राज्यमंत्री वर्षां गायकवाड, एमटीव्ही व्हीजे अनुषा दांडेकर, अभिनेत्री तारा शर्मा, मॉडेल लिसा हेडन आदी मान्यवर उपस्थित होत्या.  स्तनांचा कर्करोग याविषयी या पिंकेथॉन शर्यतीमार्फत जनजागृती निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला असून, नियमितपणे जनजागृतीचे काम केले तर महिलांना त्यांचे आरोग्य राखण्यासाठी चांगला उपयोग होईल, असे मत मॉडेल मिलिंद सोमणने व्यक्त केले. स्तनांचा कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धावणे आवश्यक आहे, म्हणूनच धावण्याच्या शर्यतीच्या माध्यमातून स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त ( Mumbaii ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-12-2012 at 01:46 IST
ताज्या बातम्या