भारतीय नौदलाने युद्धनीतीसाठी नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअरचा मार्ग स्वीकारला असून त्यासाठी आयएनएस विक्रमादित्य या बलशाली विमानवाहू युद्धनौकेवर अतिअद्ययावत संवाद आणि युद्धयंत्रणा बसविण्यात आली आहे. विमानोड्डाणाच्या निरीक्षणांसाठी प्रथमच नौदलाने थेट लाइव्ह व्हिडीओ कन्ट्रोलचा वापरही या युद्धनौकेवर केला आहे. ५०० किलोमीटर्सच्या परिघातील प्रत्येक बाब स्पष्टपणे दिसेल अशी रडार यंत्रणा हे आयएनएस विक्रमादित्यचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.
आयएनएस विक्रमादित्यचे परिचालन आणि युद्धयंत्रणा हेच अतिअद्ययावत आहे अशातला भाग नाही तर नौसनिक व अधिकाऱ्यांची निवास व्यवस्थाही आजवरच्या तुलनेत खूपच चांगली राखण्यात आली आहे. आयएनएस विक्रमादित्य या तरंगत्या युद्धभूमीची उंची ६० मीटर्स उंच असून ही उंची २० मजली इमारतीएवढी आहे. तिच्या २० मजल्यांमध्ये २४ डेक्स आहेत. युद्धनौकेची लांबी २८४ मीटर्स म्हणजेच फुटबॉलची तीन मदाने एका ओळीत ठेवली तर त्यांच्या लांबीइतकी आहे.
mv03तिच्यावर असलेल्या १६०० ते १८०० नौसनिकांना महिन्याभरासाठी दर महिन्याला एक लाख अंडी, २० हजार लीटर्स दूध आणि १६ टन तांदूळ लागतो. ही रसद पूर्ण भरलेल्या अवस्थेत ही विमानवाहू युद्धनौका सलग ४५ दिवस प्रवास करू शकते. दर दिवशी ४०० टन खारे पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी यावर एक जलशुद्धीकरण प्रकल्पच वसविण्यात आला आहे.
यापूर्वी भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये आयएनएस विराट ही एकमेव विमानवाहू युद्धनौका होती आणि तीदेखील आता तब्बल ५५ वष्रे वयाची झाली आहे. तिचे आयुष्यमान आपण दरखेपेस पाच ते दहा वर्षांनी वाढवतो. तिने तिची कमाल आयुर्मर्यादा केव्हाच पार केली आहे. फार तर अजून चार-पाच वष्रे ती काढू शकेल. त्यामुळे आयएनएस विक्रमादित्य नौदलात दाखल होणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भारताचा अतिशय जवळचा हितशत्रू असलेला चीन आता खूप मोठय़ा प्रमाणावर डोके वर काढतो आहे. चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केली असून आता श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश आदी सर्व शेजारील राष्ट्रांनाही हाताशी धरून भारताची कोंडी केली आहे. आजवर भारताचा पूर्व किनारा सुरक्षित होता, पण म्यानमारमधील बंदर चीनने भाडेपट्टय़ावर घेतल्याने भारताचा पूर्व किनारा सुरक्षित नाही. एकूणच यामुळे अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या ठिकाणी प्रत्येकी एक विमानवाहू युद्धनौका असणे ही भारताची गरज आहे. आता आयएनएस विक्रमादित्यमुळे भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकांची संख्या दोनवर गेली आहे.