उपनगरी गाडी सिग्नलला थांबली किंवा हळू झाली असता दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर दंडुक्याचा फटका मारून भ्रमणध्वनी चोरणाऱ्या चोरटय़ांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाने मोहीम उघडली आहे. रेल्वे सुरक्षा बलाने मध्य आणि हार्बर रेल्वेवर गेल्या काही दिवसांत भ्रमणध्वनी व सोनसाखळी चोरीचे २० गुन्हे उघडकीस आणले आहेत.
मध्य आणि हार्बर रेल्वेवर भ्रमणध्वनी चोरीच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. प्रवाशांच्या हातावर फटका मारून भ्रमणध्वनी चोरण्याचे तंत्र चोरांकडून अवलंबिण्यात येत होते. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून या चोऱ्या रोखण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.
वडाळा, कल्याण, डोंबिवली, ठाणे, ऐरोली, कोपर, नाहूर, कोपरखैरणे, रबाळे, कोपरी पूल, विटावा पूल आदी ठिकाणी भ्रमणध्वनी चोरले जात असल्याचे आढळून आले होते. येथे पाळत ठेवून पोलिसांनी चोरटय़ांना अटक केली. यात अल्पवयीन मुलांपासून गर्दुल्ल्यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आल्याचे चौकशीत आढळून आले आहे.