स्वातंत्र्यदिनी कोयना धरणातील पाण्याचे लोकप्रतिनिधींच्या हस्ते पूजन करून पाण्याचा विसर्ग करण्याची परंपरा आहे. यंदा मात्र, कोयना जलाशयातून प्रारंभीच्या ४० दिवसातच पाणी सोडणे अपरिहार्य बनले. गेल्या सव्वा दोन महिन्यात अपवाद वगळता कोसळलेल्या सततच्या पावसाने बळीराजा सुखावला असून, सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. गतवर्षी आजमितीला धरणात जेवढे पाणी आवक झाले होते. यंदा धरणातून जवळपास तितकेच पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
सुमारे ६९ टीएमसी पाण्याचा धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. गतवर्षी आजमितीला ८५ टक्के भरलेले कोयना धरण यंदा सुरुवातीच्या ४० दिवसांपासून भरून वाहिले आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या महाकाय कोयना जलाशयात गेल्या सव्वादोन महिन्यात १३८ टीएमसी म्हणजेच धरणाच्या क्षमतेच्या १३१.११ टक्क्यांपेक्षा अधिक तर यंदा धरण क्षमतेने भरावयास लागणाऱ्या पाण्याच्या जवळपास दुप्पट पाण्याची धरणात आवक झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेतही कोयना धरणात जवळपास दुप्पट पाण्याची आवक झाली  आहे. कोयना धरण पाणलोटक्षेत्रातील जोमदार पाऊस बऱ्यापैकी ओसरल्याने कोयना धरणाचे दरवाजे काल शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून २ फुटांवरून १ फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात पायथा वीजगृहासह ९,७६४ क्युसेक पाण्याचा  विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, ११,५४६ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाची जलपातळी काहीशी वाढून दिवसभरात स्थिर राहिल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे. दरम्यान, कोयना नदीवरील संगमनगर धक्का पुलावरील पाणी ओसरल्याने सुमारे ३५ गावातील या पुलावरची वर्दळ पुन्हा पूर्ववत झाली आहे. दरम्यान, पावसाचा रात्रीचा जोर तर, दिवसाची ओढ अशी तऱ्हा कायम राहिली आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात १७ एकूण ४,७९५, महाबळेश्वर विभागात ३५ एकूण ५,१८०, तर नवजा विभागात सर्वाधिक  ४४ एकूण ५,७०६ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. हा सरासरी पाऊस ५,२२७  मि. मी. असून, तो आजवरच्या सरासरीत सुमारे २८ टक्क्याने जादा आहे. गतवर्षी एकूणच संपूर्ण हंगामात परतीच्या पावसासह ४७७६.३३ मि. मी. पावसाची नोंद असून, त्यापेक्षाही आजअखेरचा पाऊस सुमारे ९ टक्क्याने अधिक म्हणजेच ४५१ मिलिमीटर जादा आहे. आज दिवसभरात धरण क्षेत्रात २७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाखालील कराड व पाटण तालुक्यातही गतवर्षी एकूणच सव्वाशे दिवसांच्या प्रदीर्घ हंगामातील सरासरीपेक्षाही जादा पाऊस झाल्याची नोंद आहे.  
दरम्यान, कोयना धरणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्प शिगोशिग भरून वाहात असून, या प्रकल्पातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर असल्याची आकडेवारी आहे.  दिवसभरात कोयना धरणाची जलपातळी २ इंचाने वाढून स्थिर आहे. सध्या धरणाची पाणीपातळी २,१५८ फूट २ इंच असून, पाणीसाठा ९८.३५ टीएमसी म्हणजेच ९३.४५ टक्के आहे. दरम्यान, धरणाच्या ६ वक्र दरवाजातून तसेच पश्चिमेकडील ऊर्जानिर्मितीसह पायथा वीजगृहातून ७० दिवसात जवळपास ६८ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यातील ५६ टीएमसी पाणी दरवाजातून सोडण्यात आले. हे पाणी विनावापर वाहून गेले आहे. तर पायथा वीजगृहासाठी पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी सुमारे १२ टीएमसी पाणी उपयोगात आले आहे. सध्या कृष्णा, कोयना सर्वसाधारण पाणीपातळीने वाहात असून, सध्यातरी पूर अथवा महापुराचा धोका संभवत नसल्याचे पाटबंधारे खात्याने स्पष्ट केले आहे.