दुपारी आलेल्या पावसामुळे, तप्त उन्हामुळे हैराण झालेल्या शहरवाशांना दिलासा मिळाला. जिल्ह्य़ाच्या अनेक भागामध्ये सुट्टीच्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केलेल्या संयोजक व भाविकांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.    
गेले आठवडाभर उन्हामुळे कोल्हापूरकर हैराण झाले होते. हवेत उष्मा वाढल्याने जोरदार पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तविला जात होता. तो रविवारी दुपारी खरा ठरला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने बरण्यास सुरुवात केली. शहर व परिसरात तासाहून अधिक काळ जोरदार पाऊस कोसळत होता. ढगांचा गडगडाट व सोसाटय़ाचा वारा यामुळे पावसाची तीव्रता जाणवत होती. सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या अनेकांची पावसामुळे गैरसोय उडाली. जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. त्यातून मार्ग काढून पुढे जातांना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.     
गणेशोत्सवाचा आज सातवा दिवस होता. या दिवशी महाप्रसादाचे आयोजन अनेक मंडळांकडून केले जाते. सायंकाळी-रात्रीच्या वेळी पावसाची हजेरी लागत असल्यामुळे अनेक मंडळांनी दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. महाप्रसादाचे वाटप ऐन भरात आले असतांना वरूणराजाने कोसळण्यास सुरुवात केली. यामुळे गणेशभक्त, भाविक व संयोजक यांना धावपळ करावी लागली. तासाभरानंतर पाऊस थांबल्यानंतर पुन्हा महाप्रसाद सुरू झाला. सखल भागात साचलेले पाणी वाहून गेल्याने वाहतूक पूर्ववत झाली.