मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुचर्चित तसेच बहुप्रतिक्षित उत्तर महराष्ट्र विभागीय सभेस अपेक्षेप्रमाणे प्रचंड गर्दी झाली असली तरी या सभेत राज यांनी स्थानिक नेते व त्यांचे गैरव्यवहार तसेच घोटाळ्यांवर कोणतेच भाष्य न केल्याने गर्दीचा काहीसा अपेक्षाभंग झाला.
राज हे आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शनिवारी सायंकाळी शहरात दाखल झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना अजित पवार किंवा एकनाथ खडसे यांच्याशी आपले भांडण नाही. पण जे चुकतात व चुकीचे काम करतात त्यांच्या बद्दल आपण बोलणारच, असे सांगितले होते. आपण काय बोलावे व काय बोलू नये हे स्वत: ठरवितो. भाषणाची आपण तयारी करीत नाही. ऐनवेळी जे सूचते त्यावरच आपण बोलतो असेही त्यांनी नमूद केले होते. सिंचन घोटाळा, तापी महामंडळ तसेच एकनाथ खडसे यांना संबोधून केलेल्या आरोपांबद्दल त्यांना काही पत्रकारांनी विचारले असता खडसे यांच्या बद्दल बोलणे त्यांच्यापेक्षा तुम्हालाच जास्त लागलेले दिसते असा टोमणाही त्यांनी मारला होता. त्यामुळे त्यांच्या जाहीर सभेविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती.
शहराच्या सागर पार्क मैदानावर जाहीर सभेसाठीची उपस्थिती मनसे पदाधिकाऱ्यांकडून लाखाची सांगण्यात येत असली तरी पोलिसांच्या अंदाजानुसार ही गर्दी ५० हजारपेक्षा अधिक नसल्याचे सांगण्यात आले. राज यांनी आपल्या भाषणात मराठी माणसाला नोक ऱ्या, परप्रांतीय, मराठा आरक्षण, जातीपातीचे राजकारण, इतिहास, मुंब्र्यातील इमारत दुर्घठना, भारनियमन आदी विषयांना स्पर्श केला. आर. आर. पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. उपस्थितांना राज  हे एकनाथ खडसे व सुरेश जैन यांच्याबद्दल काहीतरी बोलतील, असे वाटत होते. मात्र आ. सुरेश जैन यांनी दोन वर्षांपूर्वी नागपूर येथे त्यांची घेतलेली भेट आणि विधान परिषदेसाठी झालेला ९५ कोटींचा खर्च याचा तेवढा उल्लेख केला. ते बोलत असताना कोणीतरी एक चिठ्ठी आणून दिली. त्यानंतर त्यांनी भाषण आटोपते घेतले.
शिवसेनेचे आमदार सुरेश जैन एक वर्षांपेक्षा जास्त काळापासून घरकुल घोटाळ्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. जिल्हा सहकारी बँकेतील गैरव्यवहारातही त्यांचे नाव घेतले जाते. वाघूर पाणी पुरवठा योजना, विमानतळ विकास तसेच अ‍ॅटलॉटा कंपनीकडून शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामातील गैरव्यवहार, अशा सर्व प्रकरणातही जैन यांच सहभाग असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते खडसे यांच्यावरही राज ठाकरे यांनी गेल्याच महिन्यात ‘सेटलमेंट’चा आरोप केला होता. तापी पाटबंधारे विभागातील अधिकारी आजही खडसे यांच्या इशाऱ्यावर व दबावात काम करीत असल्याचा आरोप नेहमीच होतो.
या पाश्र्वभूमीवर मनसेच्या आमदारांनी सिंचन विभाग व पाटबंधाऱ्याच्या काही अधिकाऱ्यांची सभेच्या दोन दिवस आधी भेट घेतल्याचे सांगण्यात येते. जळगावचे काही माजी महापौर आजी-माजी नगरसेवक व माजी नगराध्यक्षांना घरकुल प्रश्नी अटक करण्यात आली होती. पालक मंत्री गुलाब देवकर हे सुद्दा त्यातीलच एक संशयित आहेत. या सर्व मुद्यांवर ठाकरे बोलतील किंवा हे मुद्दे ते उपस्थित करतील अशी सर्वाची अपेक्षा होती. मात्र त्यावर ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे उपस्थितांची काहीशी निराशा झाली. स्थानिक पदाधिकारी प्रदेश सरचिटणीस जयप्रकाश बाविस्कर, अतुल चांडक, आ. वसंत गिते, जिल्हा संपर्क प्रमुख गजानन राणे, महिला नेत्या शालिनी ठाकरे आदिंच्या भाषणांनाही उपस्थितांची दाद मिळाली.