पोलिसाच्या मृत्यू प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणाऱ्या गृहखात्याने वसगडे गोळीबारात चंद्रकांत नलवडेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी पत्रकार बठकीत करण्यात आली.  
या मागणीसाठी १५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील १० तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून न्याय्य मागण्यांसाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी संघटनेने केली आहे, असे या वेळी सांगण्यात आले.
प्रदेश प्रवक्ते महेश खराडे, युवा जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा, बी.जी.पाटील, सयाजीराव मोरे आदींनी या वेळी बोलताना सांगितले की, २ वर्षांपूर्वी आंदोलनात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी मोहन पवार यांचा नुकताच मृत्यू झाला.  आंदोलनानंतर काही काळ ते पोलीस सेवेतही कार्यरत होते.  असे असताना घटना घडली त्यादिवशी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये असताना त्यांना जबाबदार धरून खुनाचा गुन्हा दाखल होत असेल तर वसगडे येथे चंद्रकांत नलवडे यांचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याप्रकरणी गृहमंत्रालयाचे प्रमुख म्हणून गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर सुद्धा खुनाचा गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त ठरते.  चंद्रकांत नलवडे याचा दि. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी आंदोलनावेळी पोलीस गोळीबारात मृत्यू झाला होता.  याची दंडाधिकारीय चौकशी अद्याप सुरू आहे.
राजू शेट्टी यांच्यावर खुनाचा गुन्हा ओढूनताणून दाखल केल्याबद्दल संघटनेच्यावतीने तासगांव येथे मंगळवारी गृहमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. मात्र, या घटनेची प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे तासगांव बंद करून एस.टीवर दगडफेक केली. याप्रकरणी सुद्धा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.  नुकसानीची भरपाई पदाधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
कवठेमहांकाळ बंद
गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळयाचे दहन केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कवठेमहांकाळ येथे बंद पाळण्यात आला.  या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.