गुंड रवी पुजारी, छोटा शकील आदी गुंडांच्या खंडणीखोरीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. पुजारीच्या गुंडांना सळो की पळो करून सोडले असून आता तुरुंगातून हत्येसाठी वा खंडणीसाठी सुपारी दिली जाऊ नये, यासाठी विविध गुंडांना न्यायालयात सुनावणीसाठी आणल्यानंतर आप्तांप्रमाणेच इतरांशी होणाऱ्या त्यांच्या मुलाखतींवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी साध्या वेशात या गुडांना कोण भेटतो याची माहिती ठेवत आहेत.
पुजारी टोळीने थेट एका पत्रकाराची हत्या करण्याचे ठरविल्यानंतर अधिकच सतर्क झालेल्या पोलिसांनी पुजारी टोळी नेस्तनाबूत करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. पुजारी टोळीशी संबंधित सर्व गुंडांची यादी तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर तब्बल सव्वाशेहून अधिक गुंड असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी काही तुरुंगात आहेत तर काही जामिनावर सुटलेले आहेत. या सर्वावर करडी नजर ठेवण्याचे आदेशही गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व युनिटस्ना देण्यात आले आहेत.
तुरुंगात असलेल्या गुंडांकडून खंडणीसाठी वा हत्येसाठी सुपारी दिली जाते. या गुंडांना तारखेच्या वेळी न्यायालयात आणले जाते तेव्हा नातेवाईकांसोबत त्यांचे काही साथीदारही मुलाखतीसाठी येत असतात. तेव्हा ही सुपारी दिली जाते, याची कल्पना असलेल्या पोलिसांनी आता अशा मुलाखतींवर नजर ठेवण्याचे ठरविले आहे. न्यायालयातील या मुलाखतींसाठी कोण कोण येतात, त्यांची पाश्र्वभूमी काढण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत. केवळ पुजारी टोळीच नव्हे तर छोटा शकील, इजाज लकडावाला टोळीतील गुंडावरही अशाच पद्धतीने नजर ठेवली जाणार आहे.