कोल्हापूर महापालिकेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे रमेश पोवार यांची गुरूवारी निवड झाली. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडीचा कार्यक्रम केवळ औपचारिकता राहिली होती. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली.स्थायी समितीचे सभापती राजू लाटकर यांनी गेल्या आठवडय़ात पदाचा राजीनामा दिला होता. महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सत्ता समीकरणानुसार यावर्षीचे स्थायी समितीचे सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले. मात्र या पदासाठी पक्षातील अनेक नगरसेवक इच्छुक होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन स्थायी समितीचे खांडोळी करण्याचे सूत्र पक्षनेत्यांनी स्वीकारले. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहा महिन्याच्या दोन सत्रात दोघांना संधी देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार त्यांनी राजू लाटकर यांना सहामहिन्याचा कालावधी लोटल्यानंतर राजीनामा देण्यास सांगितले होते. या रिक्त जागेसाठी निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. तथापि रमेश पोवार यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने ही निवड केवळ औपचारिकता उरली होती. त्यावर जिल्हाधिकारी माने यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडीनंतर जिल्हाधिकारी माने, महापौर प्रतिभा नाईकनवरे, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार यांनी रमेश पोवार यांचे अभिनंदन केले. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर नूतन सभापती पोवार यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत स्वागत केले. त्यानंतर समर्थकांनी पोवार यांची मिरवणूक काढली. ते राहत असलेल्या महाराणा प्रताप चौकात दिवसभर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी होत होती.

27