किटी पार्टी, जुगाड, मिक्सी, निवास या भारतीय वारसा लाभलेल्या शब्दांबरोबरच ‘रांगोळी’ या मराठी शब्दाचा समावेश ‘ऑक्सफर्ड’च्या आगामी आवृत्तीत करण्याचा विचार सुरू आहे. तसेच भारतातील विविध भाषांत वापरल्या जाणाऱ्या १२० शब्दांना नव्या आवृत्तीत स्थान दिले जाणार आहे.
‘ऑक्सफर्ड युनिव्‍‌र्हसिटी प्रेस’तर्फे (ओयूपी-इंग्लंड) प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘ऑक्सफर्ड – अ‍ॅडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी’च्या आगामी म्हणजे नवव्या आवृत्तीत तब्बल १२० भारतीय शब्द समाविष्ट करण्यात येणार आहेत. या यादीत एकमेव मराठी शब्दाने स्थान मिळविले आहे आणि तो शब्द म्हणजे ‘रांगोळी’. ‘रांगोळी’ या शब्दाचे हिंदीतील ‘रंगोली’ या शब्दाशी साधम्र्य आहे. दोन्ही शब्दांचे स्पेलिंग एकच आहे. ‘रांगोळी’च्या या इतर भारतीय भाषांमधील अर्थावर व छटांवर ऑक्सफर्डच्या भाषा संशोधन विभागाचा अभ्यास सुरू आहे. संशोधनाअंती ऑक्सफर्डच्या नव्या आवृत्तीत समाविष्ट होणारे १२० शब्द कोणते असतील, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ‘ऑक्सफर्ड युनिव्‍‌र्हसिटी प्रेस’च्या (ओयूपी-इंग्लंड) प्रकाशक एलिझन वॉटर्स यांनी ई-मेलवरून दिलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिली. गेल्या महिन्यात इंग्रजी व्याकरणासंदर्भात शिक्षकांसाठी झालेल्या कार्यशाळेच्या निमित्ताने त्या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी किटी पार्टी, जुगाड, मिक्सी, निवास हे भारतीयांमध्ये प्रचलित असलेले शब्द ऑक्सफर्डच्या नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यासंदर्भात विचार असल्याचे सांगितले होते. बॉलिवूड, समोसा, नमस्कार, भाजी, कब्बड्डी, तंदुरी, भांगडा, दुपट्टा, लाख, मैदान, बिंदी आदी भारतीय शब्दांबरोबरच एअर-डॅश, चार्जशीट, प्रीपोन, अंडरट्रायल अशा भारतीयांनी रूढ केलेल्या इंग्रजी शब्दांचा आतापर्यंत ऑक्सफर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.
..पण वापर टाळावा
भारतीय, फ्रेंच, जर्मन आदी इतर भाषांमधील रूढ व प्रचलित शब्द जरी ऑक्सफर्डने आपल्या नव्या आवृत्यांमध्ये समाविष्ट करून घेतले असले तरी औपचारिक स्वरूपाचे लेखन करताना या शब्दांचा वापर टाळला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना औपचारिक इंग्रजी शब्दांच्या वापराचीच सवय लावावी,’ असेही वॉटर्स यांना वाटते. ‘कथा, कादंबरी, कविता आदी वेगळ्या स्वरूपाच्या लिखाणात मात्र या शब्दांचा वापर करायला हरकत नाही,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

रांगोळी की रंगोली
रांगोळीतील ‘ळ’ या अक्षराचा उच्चार केवळ मराठीत केला जातो. हिंदीत बोलताना तो ‘ल’ असा होतो आणि शब्दाचा उच्चारही ‘रंगोली’ असा होतो. त्यामुळे, रांगोळीतला ‘ळ’ उच्चारही ऑक्सफर्ड स्पष्ट करणार का आणि तो कसा असा प्रश्न आहे.