दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल मालमोटारचालक लक्ष्मण ऊर्फ मोदक्या नामदेव कांबळे (३०, रा. उमराणी, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) यास सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रु.दंडाची शिक्षा सुनावली आहे.
भंडारकवठे येथे १३ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी राजकुमार चिंचोळकर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमागे एका आठ वर्षांच्या मुलीला मालमोटारचालक मुदक्या कांबळे याने खेळणी विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून जवळ बोलावून घेतले व तिच्यावर बलात्कार केला. ही बाब उघड होताच गावकऱ्यांनी मुदक्या यास पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याविरूध्द मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना होरे यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी तपासलेल्या साक्षीदारांपैकी पीडित मुलीची आई, वैद्यकीय अधिकारी व पोलीस तपास अधिकारी विनोद घुगे यांची साक्ष महत्त्वाची ठरली.अ‍ॅड. शेंडे यांचा युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायालयाने आरोपीला दोषी धरले. आरोपीतर्फे अ‍ॅड. एस. आर. उंबरजे यांनी काम पाहिले.