परभणीतील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायाच्या बलात्कार प्रकरणात कॉन्स्टेबल शशिकांत टाकरस यास मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. टाकरस यास सेवेतून निलंबित करण्यात आले.
या पीडित महिलेची दोन-अडीच वर्षांपूर्वी पोलीस खात्यात भरती झाली. त्यानंतर तिची व टाकरसची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पीडित महिला प्रशिक्षणासाठी नागपूरला असताना दोन वेळा एका लॉजवर टाकरसने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. टाकरस याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. संबंध सुरू असतानाच टाकरसने या महिलेची चित्रफीत काढली. त्याचा धाक दाखवत त्याने दोन वष्रे तिच्यावर अत्याचार केले. विवाहानंतरही चित्रफितीची भीती दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. अखेर या महिलेने नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने टाकरसविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.
मंगळवारी रात्री नानलपेठ पोलिसांनी त्याला अटक केली. तपासणी अधिकारी कोल्हे यांनी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता २०पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अधीक्षक संदीप पाटील यांनी टाकरस याला निलंबित केले.