पनवेलच्या किरकोळ बाजारात कांद्याचा दर भडकल्याने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आले आहे. सुमारे २२ ते २५ रुपये किलोने विकला जाणाऱ्या कांद्याने अचानक पंधरा रुपये अधिकची मजल मारत ४० रुपयांपर्यंत झेप घेतल्याने सामान्यांच्या ताटातून कांदा गायब झाला आहे.

पनवेलच्या शहरातील काही दुकानांवर कांदा ३० रुपयांनी मिळतो, तर ग्रामीण परिसरात दुकानांची संख्या कमी असल्याने कांद्याच्या दरवाढीचा फायदा दुकानदारांनी घेण्यास सुरुवात केली आहे. कोंडले गावात कांदा ३२ रुपयांनी विकला जातो. तळोजा परिसरातील एमआयडीसीजवळच्या घोट व तोंडरे गावात कामगारवर्ग मोठय़ा प्रमाणात आहे तेथे कांदा ३५ रुपयांनी विकला जातो.

नवीन पनवेल व कळंबोली वसाहतींमध्ये कांद्याने ३५ रुपयांचा किलोमागे दर वधारला असला, तरीही नेहमी खाद्यपदार्थावर अतिरिक्त दर आकारणाऱ्या कामोठे येथे कांद्याचा दर ३५ रुपयांवर स्थिरावला आहे.

पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रामदास नगरकर या कांदा विक्रेत्याने २५ रुपये किलोदराने कांदा विकत असल्याचे सांगितले. परंतु हाच कांदा किरकोळ बाजारातील सामान्यांपर्यंत विक्रीस जाईपर्यंत सात ते दहा रुपये चढय़ा दराने विकले जात असल्याचे सांगण्यात येते.