करवीर नगरीत होणाऱ्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची शनिवारी जय्यत तयारी झाली. उद्या विजयादशमीदिनी दसरा चौकातील पटागंणात सूर्यास्तावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शम्मी पूजण्याचा विधी होणार आहे. या सोहळ्यास प्रथेप्रमाणे छत्रपतींचे राजघराणे, मानकरी घराणे, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित असणार आहेत. या महोत्सवाची तयारी पूर्ण झाल्याचे चित्र शनिवारी सायंकाळी दिसत होते.    
देशात म्हैसूर व कोल्हापूर या दोन संस्थानातील दसरा ऐतिहासिक स्वरूपाचा म्हणून ओळखला जातो. म्हैसूरचा दसरा सरकारी खर्चाने होत असतो. तर करवीर नगरीतील दसरा हा दसरा महोत्सव समितीच्या वतीने साजरा केला जातो. गेले दोन दिवस दसरा चौकात या महोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू होती. मैदानाच्या दक्षिण-उत्तर व पूर्व-पश्चिम अशा काटकोनातील जागेत मंडप उभारणी करण्यात आली असून तेथे विशेष निमंत्रितांसाठी बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.     
घटस्थापना ते दसरा या कालावधीत दसरा महोत्सव समितीकडे काही विशेष जबाबदारी सोपविली जाते. त्यामध्ये ललिता पंचमीच्या दिवशी त्र्यंबोली देवीजवळ कोहळा फोडण्याचा विधीचा समावेश आहे. याशिवाय दसरा चौक मैदानात विजयादशमी दिनासाठी महापालिकेकडून मैदानाची तयारी करवून घेतली जाते. मैदानात रोलिंग फिरवणे, पाणी मारणे, स्वच्छता ही कामे महापालिकेकडून आज करण्यात आली. तसेच दसरा चौकात छत्रपतींचे निशाण रोवणे, कमानी उभारणे, शम्मी पूजनाच्या जागेवर लकडकोट उभारणे आदी कामे दसरामहोत्सव समितीने शनिवारी पूर्ण केली.    
उद्या महालक्ष्मी मंदिरातून महालक्ष्मीची तर भवानी मंडपातून भवानीमाता व गुरू महाराज यांची पालखी सायंकाळी निघणार आहे. ती पावणे सहाच्या दरम्यान वाजत-गाजत दसरा चौकात पोहोचणार आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शाहू महाराज शाही परिवारासह दसरा चौकात दाखल होतील. परंपरेप्रमाणे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर ६ वाजून १० मिनिटे या सूर्यास्ताच्यावेळी त्यांच्या हस्ते शम्मी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती दसरा महोत्सव समितीचे सचिव बंटी ऊर्फ विक्रमसिंह यादव यांनी दिली.