गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात अनेक मोठय़ा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, महापालिकेतील सहायक आयुक्त, नगर अभियंता तसेच जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदल्या झाल्या. नव्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने तूर्त वानखेडे यांच्याकडेच पदभार आहे. असे असले, तरी एकूणच जिल्हय़ात चांगले अधिकारी येण्यास अनुत्सुक असून, गेल्या काही वर्षांत प्रशासकीय पातळीवर जिल्ह्याचा लौकिक खालावत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. वानखेडे यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची अकोला येथे महाबीज संचालकपदावर बदली झाली. त्यांच्या जागेवर अजून दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नसल्याने डॉ. वानखेडे यांनी पदभार सोडला नाही. तसेच चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याही याच दरम्यान बदल्या झाल्या. यात परभणी शहरचे उपविभागीय अधिकारी राहुल माखणीकर, जिंतूरचे प्रशांत बच्छाव, सेलूचे चंद्रकांत अलसटवार व गंगाखेडचे एन. डी. गोरे यांचा समावेश आहे. जि. प.चे सामान्य विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांचीही जालना येथे बदली झाली. दोन दिवसांपूर्वी मनपातील ५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. नगर अभियंता रामराव पवार यांची जालना येथे, नगररचनाकार अजय कस्तुरे यांची बार्शी येथे, तर वीज अभियंता अनिल माळवदकर यांची बीड येथे, सहायक आयुक्त मुजीब खान यांची वसमत, तर प्रशासकीय अधिकारी पंडित मुंढे यांची गंगाखेड येथे बदली झाली. महापालिकेत आधीच अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा आहे. महापालिकेने सादर केलेल्या आकृतिबंधाला नुकतीच मंजुरी मिळाली. त्या दृष्टीने १२ जूनच्या विशेष सर्वसाधारण सभेत या अधिकाऱ्यांना महापालिका सोडण्याची शक्यता कमी आहे. या सभेनंतरच या वर निर्णय होऊ शकतो.
जिल्ह्यात चांगले अधिकारी येण्यास नेहमीच टाळाटाळ करतात. या उलट महसूल व पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसाठी परभणी जिल्हा ही पर्वणी असतो. अशा वेळी जिल्ह्यात चांगल्या अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. विशेषत: पोलीस खात्यात कर्तबगार अधिकाऱ्यांची वानवा असून, त्यामुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. अनेक महत्त्वाच्या घटनांचा तपास लागत नसल्याने पोलीस यंत्रणेबद्दल सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडत चालला आहे.
जिल्ह्यात चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असताना कामचुकार व बेजबाबदार अधिकाऱ्यांनी मात्र जिल्ह्याला ग्रासून टाकले आहे. अशा अधिकाऱ्यांना अभय देत सर्वपक्षीय पुढारी त्यांचा गलथान कारभार खपवून घेत आहेत. जिल्हयाचा प्रशासकीय लौकिक दिवसेंदिवस खालावत चालला असून, चांगले अधिकारी जिल्ह्यात येण्यास धजावत नाहीत, ही शोकांतिका ठरू लागली आहे.