राज्यात प्रथम, देशात व्दितीय तर जगात सोळाव्या क्रमांकावर असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती दूध संघाने (गोकुळ) प्रतिदिन ९ लाख लिटर्स दूध संकलनाचा टप्पा ओलांडला आहे. गोकुळने नुकतेच दिवसाला ९ लाख ३० हजार २७८ लिटर्स इतके दूध संकलन करून या वर्षीची एक दिवसाची उच्चांकी दूधसंकलनाची नोंद केलेली आहे, अशी माहिती अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी येथे दिली.
गोकुळकडे म्हैस दूध ५ लाख ९७ हजार ६५२, तर गाईचे दूध ३ लाख ३२ हजार ६२६ लिटर्स इतके संकलित झालेले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळ जवळ १ लाख ८० हजार ९१५ लिटर्स इतके जादा दूध गोकुळकडे संकलन होत आहे. लवकरच गोकुळ दररोज १० लाख लिटर्स दूध संकलन करेल, असा विश्वासही अध्यक्ष डोंगळे यांनी व्यक्त केला.
डोंगळे पुढे म्हणाले की, गोकुळच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत ९ लाख लिटर्सचा दूध संकलनाचा टप्पा ओलांडल्याबद्दल मला विशेष आनंद वाटत आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ाबरोबरच सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ांतून तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील काही गावांमधून गोकुळ दररोज दूध संकलन करत आहे. १६६४ गावातील ४८२० दूध संस्थांच्या माध्यमातून गोकुळकडे दूध पुरवठा केला जात आहे. गोकुळने आपल्या अथक परिश्रमातून दूध संस्थांना देऊ केलेल्या सेवा-सुविधा याचबरोबर दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या उच्चांकी दूध दरामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ाबरोबरच गोकुळला होणाऱ्या दूध पुरवठय़ामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. तसेच वासरू संगोपन योजनेमुळे दूध उत्पादन वाढीस चालना मिळाली असल्याचेही अध्यक्ष डोंगळे यांनी यावेळी नमूद केले.