मुंबई महापालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतरही त्यांच्या बँक खात्यावर जमा होणारे निवृत्त वेतनाची त्याचे नातेवाईकच एटीएम कार्डद्वारे चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. निवृत्ती वेतन विभागातील मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यात पालिका अपयशी ठरली असून दरवर्षी पालिकेला सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा भरुदड सोसावा लागत आहे.
पालिकेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार निवृत्ती वेतन सुरू होते. कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याची पत्नी अथवा पतीला हे निवृत्ती वेतन मिळते. मात्र त्यांच्या निधनानंतर निवृत्ती वेतन बंद केले जाते. निवृत्त कर्मचारी आणि त्याची पत्नी/पती या दोघांचेही निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी माहिती पालिकेला देणे गरजेचे असते. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून निवृत्ती वेतन बंद केले जाते. कर्मचारी आणि पती/पत्नीचे अशा दोघांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पालिकेला कळविली आहे. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे अशी १६०० प्रकरणे पडून आहेत. या १६०० जणांच्या बँक खात्यावर आजही पालिकेकडून निवृत्ती वेतन जमा करण्यात येत आहे. त्यापैकी काहींचे नातेवाईक एटीएम कार्डच्या साह्याने बँकेतून पैसे काढून घेत आहेत. निवृत्ती वेतनाच्या या चोरीमुळे पालिकेला दरवर्षी तीन ते चार कोटी रुपयांचा फटका बसत आहे.
याबाबत नातेवाईकांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन निवृत्ती वेतन बंद करण्याचे काम निवृत्ती वेतन विभागातील केवळ दोन कर्मचारी करीत असून त्यामुळे प्रत्यक्षात निवृत्ती वेतन बंद करण्यासाठी आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लागत आहे. सध्या या विभागात अशी १६०० प्रकरणे पडून असून ती मार्गी लावण्यासाठी किमान आठ-नऊ कर्मचाऱ्यांची गरज आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडून केल्या जाणाऱ्या निवृत्ती वेतनाच्या चोरीची माहिती भाजपचे नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे विधी समितीला दिली. हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने निवृत्ती वेतन विभागात तात्काळ कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी ज्ञानमूर्ती शर्मा यांनी केली. विधी समिती अध्यक्ष कृष्णा पारकर यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवत या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचे आदेश प्रशासनाला दिले.