झीरो फाटय़ावर कला केंद्रातील घुंगरांचा आवाज कायमचा बंद!

झीरो फाटय़ावरील रेणुका लोकनाटय़ कला केंद्रातील घुंगरांचा आवाज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायमचा बंद केला आहे. कला केंद्राच्या नावाखाली येथे अवैध व्यवसाय चालत असल्याच्या लोकांच्या तक्रारी होत्या.

झीरो फाटय़ावरील रेणुका लोकनाटय़ कला केंद्रातील घुंगरांचा आवाज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायमचा बंद केला आहे. कला केंद्राच्या नावाखाली येथे अवैध व्यवसाय चालत असल्याच्या लोकांच्या तक्रारी होत्या. या कला केंद्रात मराठवाडय़ासह विदर्भातून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.
झीरो फाटा ते एरंडेश्वर रस्त्यावर रेणुका लोकनाटय़ कला केंद्र उभारले होते. केंद्रात लोककला, लोकनाटय़ाऐवजी अवैध धंद्यांचीच चलती होती. दारूविक्री ते वेश्या व्यवसाय असे धंदे केंद्रात सुरू होते. अनेक कुटुंबे या केंद्रामुळे उद्ध्वस्त झाली. मध्यंतरी वादातून एका कर्मचाऱ्याचा खूनही झाला. झीरोफाटय़ावर असलेले शैक्षणिक संस्थांचे जाळे व विद्यार्थ्यांचा वावर यामुळे हे केंद्र बंद करावे, या साठी एरंडेश्वरसह कात्नेश्वर, नांदगावच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता. सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना या कला केंद्राचा त्रास वाढू लागल्याने ग्रामस्थांनी पूर्णा पोलीस ठाण्यासह पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे हे कला केंद्र कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी केली होती. पूर्णा पोलीस ठाण्याने टाकलेल्या छाप्यात अल्पवयीन मुलीसह लाखो रुपयांची अवैध दारूही आढळली होती. केंद्राचा मालक शिवाजी सुक्ते याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पूर्णा तहसीलदारांनी या कला केंद्राचा परवानाही रद्द केला होता, तसेच गृहराज्यमंत्र्यांनीही हे कला केंद्र कायमचे बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देण्यासाठी कला केंद्राच्या मालकाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. नुकताच खंडपीठाने या बाबत निकाल देत हे केंद्र कायमचे बंद करण्याचे आदेश दिले. निकालाचे एरंडेश्वरसह परिसरातील ग्रामस्थांनी फटाके वाजवून स्वागत केले. ग्रामस्थांच्या वतीने अ‍ॅड. वसंतराव सोळंके, अ‍ॅड. सुदर्शन सोळंके, अ‍ॅड. चव्हाण, अ‍ॅड. बोराडे, अ‍ॅड. लड्डा यांनी काम पाहिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Renuka folk drama art centre closed for ever