डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. शिवाजी सरोदे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृषी संशोधन, शिक्षण व विस्तार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना भारत कृषक समाजातर्फे देण्यात येणाऱ्या कृषीगौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले. नुकताच जळगाव खान्देश येथे झालेल्या कार्यक्रमाला कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर उपस्थित होते. कृषीक्षेत्रात भरीव योगदान देणे, प्रयोगशील कार्याने शेतकऱ्यांना व समाजाला मार्गदर्शन करणाऱ्यांचा शोध भारत कृषक समाजातर्फे घेण्यात येतो. डॉ. शिवाजी सरोदे गेले २२ वर्षांपासून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांवर कार्यरत आहेत. गेल्या ११ वर्षांंपासून ते संशोधन संचालक आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०११ मध्ये नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल फेंड्रशीप सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आला होता. २००९ मध्ये राज्यस्तरीय कृषी पुरस्कार, असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. डॉ.शिवाजी सरोदे हे राष्ट्रीय व राज्यस्तरीय कृषी संलग्नित विविध समित्यांवर कार्यरत आहेत. डॉ. सरोदे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.