रामटेक तालुक्यातील नागरिक कालिदास महोत्सवाची वाट बघत असतो तो महोत्सव या वर्षी होणार की नाही याविषयी प्रशासन व लोकप्रतिनिधी संभ्रमात आहेत. सध्या तरी हा महोत्सव बारगळण्याची शक्यता असल्याने सामान्य नागरिकांची घोर निराशा होणार असल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कालिदास महोत्सवाला एप्रिलचा मुहूर्त उजाडू शकतो.
रामटेकच्या निसर्गरम्य अशा परिसरात संस्कृतचे महाकवी कालिदास यांनी जगविख्यात आणि अजरामर अशा रचना घडविल्या. अशा या महान कलावंताची आठवण म्हणून कालिदास महोत्सवाचे रामटेक येथे आयोजन करण्यात यावे, अशी नागरिक आणि लोकप्रतिनिधींची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यामुळे रामटेक येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून हा महोत्सव घेण्याचे ठरविण्यात आले. सलग दोन वर्षे हा कार्यक्रम भव्य अशा स्वरूपात व्यवस्थित पार पडला. तेव्हा या कार्यक्रमाला रामटेकमध्ये प्रेक्षक मिळतील काय अशी शंका होती, पण २०१० मध्ये म्हणजे पहिल्याच वर्षी या महोत्सवात ‘संत गजानन शेगावीचा राजा’ हे महानाटय़ आणि ‘मुलुख मराठी’ अशा कार्यक्रमांना गर्दी करून ‘रसिकांची कमी’ रामटेकमध्ये नाही हे येथील नागरिकांनी दाखवून दिले.
यानंतर २०११ साली झालेल्या दुसऱ्या कालिदास महोत्सवात ‘शिर्डी के साईबाबा’ हे महानाटय़ रामटेक येथे सादर करण्यात आले. तसेच पॅरासेलिंग, हॉट बलून, साहसिक क्रीडा, एरोमॉडेलिंग शो, अरण्यवाचन असा अनेक उपक्रमांचा येथील नागरिकांनी आस्वाद घेतला. यामुळे रामटेक परिसरातील नागरिकांच्या या कालिदास महोत्सवाशी भावना जुळल्या आहेत. परंतु प्रायोजकांची वानवा आणि इतर काही कारणांनी हा महोत्सव मागील वर्षी झाला नाही. मात्र, हा महोत्सव या वर्षी आयोजित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी बरीच मेहनत घेतली असून ९ आणि १० मार्च या तारखाही ठरल्याचे अनौपचारिकरीत्या सांगण्यात आले; परंतु कार्यक्रमाचे दिवस जवळ येत असूनदेखील प्रशासनातर्फे कोणतीच हालचाल दिसत नसल्याने या वर्षी या महोत्सवाचे आयोजन बारगळल्यातच जमा असल्याचे दिसत आहे. या महोत्सवानिमित्त रामटेक येथे सर्वत्र उत्साह दिसून येत असतो. त्याचप्रमाणे व्यापारी, ऑटोचालक, हॉटेलमालक यांनासुद्धा आवकाची संधी मिळत असते, पण रामटेकवासीय या महोत्सवाच्या आयोजनाला मुकणार असल्याचे दिसून येत आहे.