नाशिक -मुंबई प्रवासात बसला झालेल्या अपघातातून मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा उभे राहण्याच्या तयारीत असलेल्या डॉ. जेरम डिकुन्हा यांनी आता खासगी बस कंपन्या आणि या बसेसच्या चालकांना चाप बसावा यासाठी मोहीम हाती घेतली आहे. बसचालक आणि बस कंपनीच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळे आपल्यावर ओढवलेली परिस्थिती अन्य कोणावरही ओढवू नये या जाणिवेने ते ही लढाई लढण्यासाठी सिद्ध झाले आहेत.
बसचालकाचा अंदाज चुकल्यामुळे नीता टूर कंपनीच्या वोल्वो बसचा नाशिक-मुंबई मार्गावर दोन महिन्यांपूर्वी मोठा अपघात झाला होता. त्यात ११ जण मृत्युमुखी पडले तर २५ जण गंभीर जखमी झाले होते. यातीलच एक डॉ. डिकुन्हा. डिकुन्हा सप्टेंबरमध्ये नाशिकला गेले होते. तेथून मुंबईत परतत असताना त्यांनी मुक्तिधामहून नीता कंपनीची वोल्वो बस पकडली. तेथून बस निघून मुंबई नाक्यावर आली तेव्हा डिकुन्हा बसलेल्या आसनावर आणखी एका व्यक्तीचे आरक्षण असल्याचे लक्षात आले. परिणामी त्यांना तेथे खाली उतरवून मागून येणाऱ्या शिर्डी-मुंबई बसमध्ये बसविण्यात आले.
दुर्दैवाने याच बसला पुढे अपघात झाला. डिकुन्हांच्या तोंडून अपघाताची भयाण कहाणी ऐकताना अंगावर शहारे येतात. या बसचा चालक तरुण होता. तो कोणतीही वेगमर्यादा न पाळता बस पळवीत होता. त्याच्या बेदरकार चालवण्याचा प्रवाशांना त्रास होत होता. परिस्थिती लक्षात घेऊन डिकुन्हा यांनी पुढाकार घेतला आणि चालकाला समजावले. सहप्रवाशांनीही त्याला समज दिली. मात्र त्या चालकाच्या चालवण्यात काहीच फरक पडला नाही. अखेर प्रवाशांनी आम्रपाली हॉटेल थांब्यावर नीता कंपनीशी संपर्क साधला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही मग चालकाला समज दिली. मात्र झाले भलतेच. तेथून निघाल्यानंतर चालकाने वेग आणखीनच वाढविला. घाटात तर तो १०० पेक्षा अधिक वेगाने बस पळवू लागला. याबाबत तक्रार करण्यासाठी मी पोलिसांचा १०० नंबरही फिरवीत होतो. पण तेथूनही उत्तर मिळाले नाही. अखेर लाहे फाटा येथे बसने एका दुचाकीला धडक दिली आणि पुढे दुभाजकावर जाऊन आदळली आणि मुंबईहून येणाऱ्या गाडीवर उलटली, असे डिकुन्हा सांगतात. अपघात होत असताना प्रसंगावधान राखत चालकाने बसमधून पळ काढला. भीषण जखमी झालेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी कुणीही तातडीने धावून आले नाही. थोडय़ा वेळाने पोलीस आले आणि एका टेम्पोमधून त्यांनी जखमींना शहापूरच्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. टेम्पोतील हा प्रवास ते कधीही विसरू शकणार नाहीत. जखमी डिुकन्हा यांना तीन मृतदेहांसोबत ठेवण्यात आले होते. पुढे रुग्णालयात पोहोचल्यावर स्थानिकांनी जखमींच्या खिशातून पैसे काढून घेतले. डिकुन्हांच्या खिशातीलही दोन हजार रुपये चोरीला गेले. वर तब्बल तीन तास उपचारांशिवायच राहावे लागले.
११ निष्पाप जिवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आततायी चालक आज जामिनावर सुटून मोकाट फिरत आहे. त्याला शिक्षा होईल की नाही याचा भरवसा नाही. नीता कंपनी प्रवाशांना विम्याचे पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे कोरडे आश्वासन फक्त देत आहे. मुळात विम्याचे पैसे प्रवाशांच्या हक्काचेच आहेत. नीता कंपनीकडे प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतरही चालकाबाबत ती बेफिकीर राहिली. कंपनीने वेळीच काळजी घेतली असती तर ही परिस्थिती ओढवलीच नसती.
व्यवसायाने पूर्वी पायलट असलेले डिकुन्हा या प्रसंगाने प्रचंड हादरून गेले. अपघातात त्यांना अनेक दुखापती झाल्या. अपघाताला दोन महिने होऊनही ते व्हीलचेअरवरच आहेत. केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या ‘सुमती ग्राम मानवी हक्क रक्षण फोरम’च्या वांद्रे, ठाणे, नाशिक विभागाचे असलेल्या डिकुन्हा
यांनी आता खासगी बस कंपन्यांवर शासनाने चाप आणावा
यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्धार केला आहे. खासगी बसचा चालक बेदरकारपणे वाहन चालवतो आहे का, त्याने मद्यपान केले आहे का आदी बाबी तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी, असा त्यांचा आग्रह आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून तब्येत बरी झाल्यावर ते या कामाला जोमाने लागणार आहेत.
नीता कंपनीची निबर कातडी
या संदर्भात नीता कंपनीशी संपर्क साधला असता कंपनीच्या अधिकाऱ्याने बोलण्याच्या ओघात कंपनी किती निबर कातडीची आहे याचा किस्सा स्वत:च कथन केला. विम्याचे पैसे मिळवणे अतिशय जिकिरीचे असते. या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी अनेकदा वकील नेमला जातो. हे वकील मिळणाऱ्या पैशातून २५ टक्के कमिशन घेतात. डिकुन्हा यांना आम्हीच वकील मिळवून देऊ. तो २५ टक्के नव्हे तर १५ टक्केच कमिशन घेईल, अशी ‘ऑफर’ आम्ही दिली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
आम्ही जखमींच्या बाजूने-
या अपघातामध्ये जखमी झालेल्यांविषयी तसेच मृतांच्या नातेवाईकांविषयी आम्हाला सहानुभूती आहे. या बसमधील प्रत्येक प्रवाशाचा विमा असतो. तो मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व ती मदत करण्यास तयार आहोत. आता आमच्या बसना ‘स्पीड गव्हर्नर’ बसविण्यात आला असून ताशी ८० किमी वेगाची मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच प्रत्येक बसमध्ये दोन चालक ठेवण्यात आले आहेत.
कमलेश कानबार, नीता कंपनीचे अधिकारी.