तहसीलची नवीन इमारत ताब्यात घेण्यास महसूल विभागाचा नकार

तहसील कार्यालयासाठी नव्याने बांधलेल्या इमारतीचे काम निकृष्ट असल्याने ही इमारत ताब्यात घेण्यास महसूल प्रशासनाने नकार दिला असून कोटय़वधींचा निधी खर्च झालेली ही इमारत वापराविना पडून आहे.

तहसील कार्यालयासाठी नव्याने बांधलेल्या इमारतीचे काम निकृष्ट असल्याने ही इमारत ताब्यात घेण्यास महसूल प्रशासनाने नकार दिला असून कोटय़वधींचा निधी खर्च झालेली ही इमारत वापराविना पडून आहे. शासनाने यासंदर्भात निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

शहरात मध्यवर्ती असलेली तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन असल्याने जीर्ण झाली. पावसाळ्यात छत गळत असल्याने दस्तऐवजाची भिजून नुकसान होते. इमारतीच्या आवारातच पोलीस ठाणे, भूमिअभिलेख हे विभागही असल्याने इमारत वापरासाठी अपुरी पडू लागली. यामुळे तहसील कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत व्हावी म्हणून आ. निर्मला गावीत यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर केला. आहे त्याच ठिकाणी इमारत नव्याने बांधण्याचे अभिप्रेत असताना शहरापासून दोन किलोमीटरवर बोरटेंभे गावाच्या शिवारात डोंगराच्या पायथ्याशी इमारत बांधण्यात आली. इमारतीच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याने इमारत ताब्यात घेण्यास महसूल विभागाने नकार दिला आहे॰ तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक राहात असल्याने डोंगराच्या पायथ्याशी बांधण्यात आलेली ही इमारत गळण्याची शक्यता आहे. छतातून पाणी गळून कागदपत्राचे नुकसान होऊ नये यासाठी छतावर पत्रे टाकणे आवश्यक होते. संभाव्य गळती रोखली जात नाही तोपर्यंत इमारत शासन ताब्यात घेणार नाही, असे तहसीलदार महेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अत्यंत चुकीच्या ठिकाणी इमारत बांधण्यात आली असून इमारतीचे कामही निकृष्ट झाले आहे. जुन्या ठिकाणी सर्व कार्यालये एकत्र असल्याने ग्रामस्थांना एकाच ठिकाणी सर्व कामे उरकता येत होती. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होत होती. मात्र नवीन इमारत शहरापासून दूर बांधल्याने ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Revenue department reject to take possession of collector office building in nashik