कर्नाटक राज्यातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीच्या प्रश्नाने आता वेगळेच वळण घेतले असून, शिरोळ महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला. तर गणेशवाडीनजीक मंडल अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. यामुळे वाळूमाफियांचा प्रश्न आता गंभीर बनला असून, याला हिंसक वळण लागण्यापूर्वीच योग्य तो मार्ग काढावा लागणार आहे. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे कर्नाटक राज्यातून येत असलेली अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत शिरोळ महसूल विभागाने बुधवारी आकस्मिकपणे धडक मोहीम सुरू केली. अचानक कारवाई सुरू झाल्यामुळे वाळूचे ट्रक कर्नाटक राज्याच्या हद्दीतच थांबून राहिले आहेत.
पावती असल्याशिवाय वाळू वाहतूक करू देणार नाही, अशी भूमिका मंडल अधिकारी एस. बी. सुतार व नृसिंहवाडीचे मंडल अधिकारी ए. एल. माने यांच्या पथकाने घेतली. सुमारे चोवीस तास वाळू वाहतूक रोखण्याची कारवाई करण्यासाठी कोल्हापूरच्या वाहतूक निरीक्षक कार्यालयाकडील विशेष पथकासह ठाण मांडून बसले होते.     
दरम्यान, गणेशवाडी येथे वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर शिरोळच्या महसूल विभागाने कारवाई केली. यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ‘चेकनाका’ सुरू करून वाळू वाहतूक रोखली. यामुळे वाळूधारकांनी शेकडो वाहने कर्नाटकाच्या हद्दीत लावली. दुपारी कुरुंदवाडचे मंडल अधिकारी एस. बी. सुतार, कोतवाल महादेव पाटील, अकिवाटचे तलाठी तोडकर यांची वाळू ट्रकचालकांनी भेट घेऊन थांबविलेले ट्रक महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्याची विनंती केली. मात्र पावतीशिवाय एकही ट्रक सोडणार नाही, अशी भूमिका घेतल्याने ट्रकचालक व महसूल विभागातील कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर ट्रकचालकांनी वाळूचे पाच ट्रक भरधाव वेगाने गणेशवाडीच्या दिशेने सोडले. मंडल अधिकारी सुतार यांनी हे ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुतार यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न घडला, मात्र रस्त्यातून बाजूला झाल्याने ते बचावले.