लग्नसमारंभ आटोपून वधूसह आपल्या गावी परतणाऱ्या नवरदेवाची कार रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एका १२ वर्षीय मुलासह चारजण ठार, तर चारजण जखमी झाले. अमरावती-नागपूर महामार्गावर तिवसानजीक बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती, की कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघाताच्यारूपाने काळाने कोराडीतील कुटुंबावर घाला घातला.
ज्योती कवडू घुरडे (३५, रा. पंचशील नगर, अकोला), आदित्य कवडू घुरडे (१२, रा. अकोला), कारचालक नितेश प्रल्हाद उचित (४०, रा. कोराडी), अंबादास दामोधर चंद्रशेखर (३५, रा. कोराडी) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात नववधूसह चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर येथील तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नववधू स्वाती लक्ष्मण भगत (१८, रा. अकोला), रुचिका लक्ष्मण भगत (१२, अकोला), कवडू महादेव घुरडे (३२, अकोला) आणि नवरदेव सुभाष दामोधर चंद्रशेखर (२८, रा. कोराडी) अशी जखमींची नावे आहेत.
बुधवारी दुपारी सुभाष आणि स्वाती यांचा विवाह वाशीम येथे पार पडला. नववधू स्वाती हिचे निकटचे नातेवाईक आणि नवरदेवाच्या भावासह नऊ जण एम.एच. १९ / ए.डी. ३२८० क्रमांकाच्या कारने कोराडीकडे जात होते. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील त्यांची कार तिवसा टोल नाक्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर (क्र. एम.एच. ४० / वाय ३७६७) आदळली. ही धडक इतकी जबर होती की, कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला. हा नादुरुस्त ट्रक सकाळपासूनच रस्त्यावर उभा होता, अशी माहिती मिळाली आहे. अपघातात नवरदेव आणि नववधू जखमी झाले, पण नवरदेवाच्या भावासह चौघांना प्राण गमवावे लागले.  अपघातानंतर जखमींना बाहेर काढण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. अपघातस्थळी मोठी गर्दी उसळली होती. नागरिकांनी जखमींना तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक देखील तासभर खोळंबली होती. या अपघातात नववधूची नातेवाईक ज्योती घुरडे आणि तिचा बारा वर्षीय मुलगा आदित्य तसेच नवरदेवाचा भाऊ अंबादास ठार झाला आहे.
रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला वेळीच रस्त्याच्या कडेला नेण्याची व्यवस्था करण्यात आली असती, तर हा अपघात टळू शकला असता, अशी चर्चा अपघातस्थळी होती. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले असले, तरी अपघाताच्या घटनांमध्ये घट झालेली नाही. वाहनांचा भरधाव वेग त्यासाठी कारणीभूत मानला जात आहे. लग्नसराईच्या काळात तर अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये जिल्ह्य़ात गेल्या पाच दिवसांत चार वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये पाचजणांना प्राण गमवावे लागले आहेत. मंगळवारी देवगाव ते पुलगाव मार्गावर इनोव्हा कार आणि ट्रक यांच्या धडकेत इनोव्हातून प्रवास करणारे दोघे ठार झाले. इनोव्हा धामणगावहून वर्धा येथे जात होती. या अपघातात दोघे जण जखमी झाले. २ जूनला अंजनगाव सुर्जी ते अकोट मार्गावर नाक्यानजीक भरधाव ट्रकने स्कूटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला,तर एकजण जखमी झाला. त्याच दिवशी लोणी नजीक दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू झाला. १ जूनला रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक लागून एकजण ठार झाला.