ठाणे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या चोरटय़ांनी आता जिल्हा शासकीय रुग्णालयाला लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून नेत्र विभागाच्या इमारतीमधील वातानुकूलित यंत्रातील तांब्याचे पाईप आणि वायर चोरटय़ांनी चोरून नेल्याची बाब सोमवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षारक्षक कार्यरत असतानाही ही घटना घडल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या नेत्र विभागात वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रातील तांब्याचे पाईप आणि वायर इमारतीच्या बाहेरील बाजूस बसविण्यात आले असून ते चोरटय़ांनी चोरून नेले. या प्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यामध्ये ८ ते १० जानेवारी या कालावधीत चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. याशिवाय, रुग्णालय २४ तास खुले असते. तिथे अहोरात्र डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाचा राबता असतो. असे असूनही गेल्या दोन दिवसांत घडलेल्या या घटनेचा सुगावा कुणालाही लागला नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक रघुनाथ राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, इमारतीच्या मागच्या बाजूस ही चोरी झाली असून या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच या घटनेच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षारक्षकांना चोख सुरक्षेचे काम बजावण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.