भाजपच्या चिन्हावर रिपाइंचा उमेदवार?

अखेरच्या क्षणी युती आणि आघाडी तुटल्यामुळे विविध मतदार संघातून आपापले उमेदवार निवडताना राजकीय पक्षांची होणारी तारांबळ आता चव्हाटय़ावर येऊ लागली आहे. त्यातूनच अंबरनाथ विधानसभा मतदार संघात राजेश वानखेडे या एकाच उमेदवारावर रिपाइं आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

अखेरच्या क्षणी युती आणि आघाडी तुटल्यामुळे विविध मतदार संघातून आपापले उमेदवार निवडताना राजकीय पक्षांची होणारी तारांबळ आता चव्हाटय़ावर येऊ लागली आहे. त्यातूनच अंबरनाथ विधानसभा मतदार संघात राजेश वानखेडे या एकाच उमेदवारावर रिपाइं आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
महायुती तुटल्याने अनुसुचित जातींसाठी राखीव असणाऱ्या अंबरनाथ विधानसभा मतदार संघातून भाजपने उल्हासनगर येथील अपक्ष नगरसेवक राजेश वानखेडे यांना तर रिपाइं आठवले गटाने सिंद्राम कांबळे यांना उमेदवारी दिली. रामदास आठवले यांनी भाजपसोबत जाण्याचे ठरविल्याने अंबरनाथची जागा त्यांच्या पक्षासाठी सोडण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
मात्र राजेश वानखेडे यांची उमेदावारी निश्चित होऊन त्यांना भाजपचे कमळ चिन्हही मिळाले. तरीही ते रिपाइंचेच उमेदवार असल्याचा दावा रिपाइंचे जिल्हा निरीक्षक महेश खरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या या विधानामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. त्यावर भाजपचे जिल्हा महासचिव मिलिंद तेडणेकर यांनी चक्क उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी तो निवडून येणे महत्त्वाचे असल्याचे भाष्य करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सिंद्राम कांबळे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती रिपाइंचे शहर अध्यक्ष अजय जाधव यांनी दिली.
ऐनवेळी युती तुटल्याने भाजपने उल्हासनगर येथील बंडखोर शिवसैनिक राजेश वानखेडे यांना अंबरनाथमधून पक्षाची उमेदवारी दिली. तसा रितसर  एबी फॉर्मही देऊ केला.
दरम्यान रामदास आठवले यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि अंबरनाथ रिपाइंसाठी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चिन्ह कमळ असले तरी राजेश वानखेडे हे आमचेच अधिकृत उमेदवार असल्याचा दावा काही रिपाइं पदाधिकाऱ्यांनी केला दावा आहे.

मी तर युतीचा..
या संदर्भात राजेश वानखडे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी भाजप आणि रिपाइं युती असल्याने मी या दोन्ही पक्षांचा उमेदवार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rpi candidate contest election on bjp sign