रिक्षा मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीस नकार देऊन एका महिलेबरोबर उद्दाम, अरेरावीचे वर्तन करणाऱ्या एका रिक्षा चालकास कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्याची नोटीस बजावली असून या कारवाईमुळे रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पूर्वेत टंडन रस्त्यावर एका महिलेने आपणास मीटर भाडय़ाप्रमाणे ठाकूर हॉलपासून ते अंबिकानगपर्यंत जायचे आहे असे रिक्षा चालकाला सांगितले. या रिक्षाचा नंबर आहे- एमएच-०५-बीजी-३६७. रिक्षा चालकाने त्या महिलेस आपण मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करीत नाही असे सांगितले. तेव्हा या महिलेने त्या रिक्षाचा क्रमांक आरटीओ अधिकारी संजय डोळे यांना कळविला. आरटीओ कर्मचाऱ्यांनी त्वरित त्या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. रिक्षा क्रमांकावरून त्याचे घर शोधले. रिटा गुप्ता या महिलेच्या नावावर या रिक्षेचे परमिट आहे. या महिलेची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तिने चालकाचे नाव सांगण्यास व चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिला. या महिलेने चौकशीला सहकार्य केले नाहीतर तिचे परमिट रद्द करण्याच्या निर्णयाप्रत आरटीओ अधिकारी आले आहेत.
जो रिक्षा चालक मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीस नकार देईल त्या रिक्षात बसून प्रवाशांनी आरटीओच्या हेल्पलाइनवर संपर्क करावा म्हणजे कायदेशीर कारवाई करणे सोपे होते. रिक्षा चालकांच्या कोणत्याही उद्दामगिरीला प्रवाशांनी घाबरून जाऊ नये. त्यांची थेट तक्रार आरटीओ, वाहतूक कार्यालयाकडे करावी, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.