जुन्या भांडणावरून तीन-चार आरोपींनी मिळून एका गुंडाचा निर्घृण खून केल्याची घटना हिंगणा येथील महाजनवाडी परिसरात  घडली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
सुनील दुर्योधन तिवारी (४०), रा. वाघदरा, असे खून झालेल्याचे नाव आहे. अनिल पालकर, योगेश आकोडे, आदित्य मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत. सुनील तिवारी हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याची परिसरात दहशत निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी अनिल पालकर सोबत त्याचे भांडण झाले होते. या भांडणात सुनीलने त्याला पाहून घेण्याची धमकी दिली होती. त्यामुळे अनिलने त्याचा गेम करण्याचे ठरवले. गुरुवारी रात्री ११.३० वाजता तो महाजनवाडी परिसरात आल्याची माहिती अनिलला मिळाली. त्याने लगेच काही सहकाऱ्यांना बोलावून घेतले. तो दिसताच सर्वच आरोपी त्याच्यावर तुटून पडले. आरोपींनी सुनीलच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला घटनास्थळीच ठार केले. यानंतर आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच हिंगणा ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.आर. कापगते सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. परंतु तेथील डॉक्टर्स संपावर असल्याने मृतदेह मेडिकलला हलवण्यात आला. शुक्रवारी दुपापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. शुक्रवारी सायंकाळी वाघदरा येथील स्मशानभूमित त्याच्या पार्थिवावर पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.