बारवी धरणाला तडे गेले..धरणाचे पाणी सोडल्याने बदलापूर शहर पाण्याखाली जाणार..२६ जुलैसारखा प्रलय आलाय..अशा प्रकारच्या अफवांच्या सोशल मीडियावरील माऱ्याने बुधवारी कल्याणल्याड भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्यक्षात मात्र बारवी धरण केवळ ७० टक्केच भरले असून त्यातून पाणी सोडण्यात आलेले नाही. तसेच बारवी भरल्यानंतर ओसंडून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा बदलापूर शहराशी कोणताही संबंध नाही. ते पाणी जांभूळमार्गे कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते, ही वस्तुस्थिती आहे. 

दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्य़ात पावसाने दाणादाण उडवून दिल्याने ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्याने अनेकांचे नुकसान, रेल्वे सेवा ठप्प, जागोजागी वाहतूक कोंडी, रस्ते बंद अशा परिस्थितीमध्ये सोशल नेटवर्किंगच्या जगतात अफवांचे पूर वाहू लागले होते. ज्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले. बारवी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने परिसर पाण्याखाली जाणार, धरणाला तडे गेले, बदलापूर पाण्याखाली जाणार, २६ जुलैचा प्रलय पुन्हा होणार अशा प्रकारच्या अफवांना मोठा ऊत येऊ लागला होता. अनेकांनी तर कोणतीही खात्री न करताच व्हॉट्स अ‍ॅपवर येणारे फोटो सर्वाना पाठवण्याची सुरुवात केली होती. प्रत्यक्षात मात्र या अफवा असून बारवी धरण मात्र केवळ ७० टक्केच भरलेले असून त्यातून कोणत्याही प्रकारचे पाणी सोडण्यात आलेले नसल्याचे समजते.