साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या‘अक्षयतृतीयेची संधी साधत खरेदीने शहरातील बाजारपेठेत‘धूम निर्माण केली. दुष्काळाकडे दुर्लक्ष करत नगरकरांनी मुहूर्ताची पर्वणी साधली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी आणि फ्लॅटच्या बुकिंगसाठीही प्रतिसाद दिला. या प्रतिसादाने व्यावसायिकही सुखावले.
काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीचे खाली येणारे भाव व लग्नसराई यामुळे बाजारपेठेत वर्दळ जाणवत असली तरी दुष्काळामुळे त्यात जोम दिसत नव्हता. परंतु खाली आलेले भाव आता पुन्हा स्थिरावले आहेत, दर विलक्षण खाली आले तेव्हा मुहूर्त नसूनही पर्वणी साधण्याकडे ग्राहकांचा कल होता. आता तर मुहूर्ताच्या पर्वणीने त्यात जोम निर्माण केला.
मुहूर्तावर खरेदी करण्याकडे भारतीयांचा कल पूर्वीपासूनच आहे. त्याला सध्याच्या लग्नसराईची जोड मिळाली, त्याचे चित्र सराफ बाजारात दिसले. काही सुवर्णपेढय़ांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दरमहा गुंतवणुकीच्या योजना सादर केल्या आहेत. आज सोने-चांदी खरेदी केले म्हणजे त्यात दरवर्षी वाढ होतच जाणार या मानसिकतेतून खरेदीची भावना अजूनही टिकून असल्याचे एस. जी. कायगावकर पेढीचे सुभाष कायगावकर यांनी सांगितले. तयार दागिन्यात भरपूर व्हरायटी मिळत असल्याने त्यासह वेढणे, पिळ्याच्या आंगठय़ा, नेकलेस, याशिवाय चांदीचे नाणे, मूर्ती, ताम्हण याकडे कल होता. शिंगवी ज्वेलर्सचे संजय शिंगवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कालच्या तुलनेत सोन्याचे भाव दहा ग्रॅमला ३०० रुपयांनी व चांदी किलोमागे १ हजार रुपयांनी खाली आले. परंतु सरकार सोने आयातीवर बंधने टाकणार अशी चर्चा सुरू झाल्याने आगामी काळात त्यावर परिणाम होईल.
सोन्या-चांदीच्या खरेदीशिवाय मुहूर्तावर सदनिकांच्या नोंदणीकडेही कल असतो. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या प्रकल्पासाठी आगावू नोंदणीसाठी जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित केले होते. उपनगरात अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत. आजच्या मुहूर्तावर चांगला प्रतिसाद लाभल्याचे‘आंधळे-चौरे कन्स्ट्रक्शनचे राजेंद्र चौरे यांनी सांगितले.
ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन चारचाकी वाहन कंपन्यांनी काही नवीन मॉडेलही बाजारात दाखल केले. चौकशी, नोंदणीसाठी ग्राहकांची दालनातून दिवसभर गर्दी होती. ‘साईदीप’दालनाशी संपर्क साधला असता खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली. शेवर्लेट कंपनीने तीन नवी मॉडेल सादर केले, दिवसभरात २३ डिलिव्हरी झाल्या. दुष्काळामुळे दुचाकी वाहनांना अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे हीरो होंडा कंपनीच्या इलाक्षी दालनाचे सरव्यवस्थापक रामदास खांदवे यांनी सांगितले. दालनाच्या नेटवर्कच्या माध्यमातून किमान ४५० दुचाक्यांची विक्री अपेक्षित होती, परंतु ती ३०० पर्यंतच होऊ शकली.
याशिवाय फ्रीज, कुलर, एअरकंडिशनरलाही चांगला उठाव मिळाल्याचे राम एजन्सीचे राम मेंघानी यांनी सांगितले.