बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा निर्धार करीत सागर मेघेंनी, तर महिलांच्या आरक्षणाचा मुद्या रेटत चारूलता टोकस यांनी गांधी जयंतीला केलेले शक्तीप्रदर्शन हे स्वत:च्या उमेदवारीचा दावा प्रबळ करणारे ठरले असून या दोघांतील कुरघोडी राजकीय वर्तुळास स्तंभित करणारी ठरली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वर्धा मतदारसंघात काँग्रेसतर्फे  सागर मेघे व चारूलता टोकस यांनी दावेदारी चालविली आहे. त्यातूनच शक्तीप्रदर्शनाचे नवनवे फं डे पुढे येऊ लागले आहेत. एकाच दिवशी बेरोजगार व महिला अशा समाजातील दोन प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करून मेळावा आयोजनाचा या दोन नेत्यांनी घातलेला घाट लोकसत्ताने निदर्शनास आणल्यावर मेळाव्याच्या ठिकाणी त्याचीच चर्चा रंगली होती.
सागर मेघे यांनी पुलगावला घेतलेले बेरोजगार तसेच, प्रगतीशील शेतकऱ्यांचे शिबीर अभूतपूर्व असेच ठरल्याची प्रतिक्रि या आहे. दत्ता मेघे-सागर मेघे यांचे गर्दी जमविण्याचे कौशल्य वादातीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यांची बसण्याची, प्रवासाची व भोजनाची केलेली व्यवस्था बेरोजगारांना सुखावणारी ठरली. प्रत्येकाला नोकरी मिळू शकत नाही, मात्र स्वयंरोजगार निर्माण केल्या जाऊ शकतो. तेच आपण करणार असल्याचे सांगणाऱ्या सागर मेघेंनी यात राजकारण तीळमात्र नसल्याचे सांगितले. मात्र, लोकं समजून आहेत, पण यानिमित्याने कृषी व उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन ऐकायला मिळाल्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर प्रकटले.     
दुसरीकडे सेवाग्रामात चारूलता टोकस यांनी जमविलेली महिलांची लक्षणीय गर्दी आई प्रभाताई रावांचा वारसा आठवून देणारी ठरल्याचे महिला पदाधिकारी बोलतात. मात्र, या गर्दीसोबत दिल्ली दरबारी असलेले वजनही व्यासपीठावरील पाहुण्यांच्या उपस्थितीतून टोकस यांनी दाखवून दिले.
महिला कॉंग्रेसच्या दिल्ली वर्तुळातील मान्यवर नेत्या, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व पालकमंत्री राजेंद्र मुळक यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते, पण गर्दीचे रहस्य लपून राहिले नाही. त्यांचे बंधू राज्यमंत्री रणजित कांबळे यांचीच ही किमया होती. दीडशेवर बसेसच्या लागलेल्या रांगा, तसेच अन्य वाहने यामुळे जत्रेचेच स्वरूप मेळाव्याच्या ठिकाणी उमटले. प्रत्येक वक्त्याने सभेत महिला आरक्षणाचा मुद्या मांडत टोकस यांच्या संभाव्य दावेवारीला प्रबळ केले. स्वत: टोकस यांनीही याच पैलूने भाषण करीत उमेदवारीचा आधार स्पष्ट केला. याठिकाणीही भोजनाची व्यवस्था होतीच.     
मेघे-टोकस यांच्यातील कुरघोडीचा हा असा पहिलाच प्रसंग आहे. मात्र, मेघेंनी यापूर्वी जिल्ह्य़ाच्या विविध भागात मेळावे घेत शक्तीप्रदर्शन केले आहेच. मात्र, त्यांना राजकीय बॅनर लागू न देता लोकांपुढे जाण्याचाच हेतू ठेवला.
प्रत्यक्षात या दोघात दावेदारी असली तरी खरी लढाई पडद्यामागून खासदार दत्ता मेघे व राज्यमंत्री रणजित कांबळे हे लढत आहेत. पुत्रासाठी पिता, तर बहिणीसाठी भाऊ सूत्रे हाताळत आहे. मेघेंना आमदारकीचा, तर टोकस यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा थोडाबहुत अनुभव असला तरी पूर्ण वेळ राजकारणात हे दोघेही याचवेळी उतरले आहेत. एकाला वडिलांचा, तर दुसऱ्याला आपल्या आईचा वारसा लोकसभेच्या दालनात न्यायचा आहे.
त्यामुळेच ही चुरस जिल्ह्य़ातील सर्व पक्षांसाठी कमालीची रंजक ठरत आहे. विशेष म्हणजे, यापैकी एकाचे नाव निश्चित झाल्यावरच उमेदवार ठरविण्याचा विरोधी पक्षांनी सावध पवित्रा घेतल्याने यापुढील काळात शक्तीप्रदर्शनाचे नवनवे फं डे जनतेपुढे येतील.