आगामी सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, गुरुवारी त्र्यंबकेश्वर परिसरातील स्वच्छतेसाठी साधू-महंतांनी उत्स्फूर्तपणे आखाडय़ात उतरत परिसराचे रूपडे पालटले. या मोहिमेत विद्यार्थ्यांसह सामाजिक संस्था, प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. दरम्यान, त्र्यंबक नगरीत उगम पावणारी गोदावरी सिंहस्थात वाहती राहावी यासाठी उपाय योजण्याची मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेने केली आहे.
दोन महिन्यात सिंहस्थ कुंभमेळ्यास सुरुवात होत असून यानिमित्त लाखो भाविक त्र्यंबक नगरीत दाखल होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासन व नगरपालिका यांच्यातर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेचे वैशिष्टय़े म्हणजे मोठय़ा संख्येने सहभागी झालेले साधू-महंत. त्र्यंबकेश्वरच्या जुन्या बसस्थानकात स्वच्छतेची शपथ घेऊन मोहिमेला सुरुवात झाली. या वेळी सर्वश्री नरेंद्रगिरी महाराज, हरिगिरी महाराज, सागरानंद महाराज, नगराध्यक्षा अलका शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह स्वत: या मोहिमेत सहभागी झाले. पर्यावरण रक्षण व पर्यावरणाची स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गोदावरीला माता म्हणून संबोधिले जात असल्याने तिचे पावित्र्य टिकविणे आवश्यक आहे. राष्ट्र, शहर व समाजाप्रती असणारे कर्तव्य नागरिकांनी पूर्ण करावे, असे आवाहन
त्यांनी केले.
या वेळी प्रथम त्र्यंबकेश्वर परिसर व मंदिरालगतच्या घाटांची स्वच्छता करण्यात आली. निलगंगा नदी, गोदावरी-अहिल्या संगम, इंद्राळेश्वर तलाव परिसर आदी भागांतील कचरा संकलित करण्यासाठी साधू-महंतांनी झाडू हाती घेतला. जमा झालेला कचरा हलविण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली. मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी कुशवाह यांनी सूचना दिल्या.
या मोहिमेनंतर महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी गोदावरीचा प्रवाह वाहता ठेवण्याची गरज अधोरेखित केली. उज्जैनच्या कुंभमेळ्यात नदीपात्रात पाणी नसायचे. यावर तेथील शासनाने जलवाहिनीद्वारे पात्रात पाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. त्याच धर्तीवर, गोदावरी पात्रात पाणी आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. सिंहस्थ कामे सध्या वेगात सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्रक दिले.
तथापि, ही कामे पाच ते सहा महिने आधीच पूर्ण होणे गरजेचे होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे त्यास विलंब झाल्याचा आरोपही त्यांनी केला. नूतन जिल्हाधिकारी चांगले काम करत असल्याचे नरेंद्रगिरी महाराज यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर परिसराच्या स्वच्छतेसाठी आखाडय़ात उतरलेले साधू-महंत, विद्यार्थी व शासकीय अधिकारी.