मराठीतील प्रतिभासंपन्न कवी ग्रेस यांच्या कवितांवरील ‘साजणवेळा’ या संगीतप्रधान कार्यक्रमाचा अंबाजोगाईकरांनी आस्वाद घेतला. सूर आणि संगीत यांचा सुरेल संगम असा या मैफलीचा नूर होता. रसिकश्रोत्यांनी चंद्रकांत काळे व सहकाऱ्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाला भरभरून दाद दिली.
चंद्रकांत काळे यांचे सुमधुर निवेदन आणि संहितेने उपस्थितांना अंतर्मुख केले. कार्यक्रमाची संगीतरचना सुप्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांची होती. गायक मुकुंद फणसळकर, रमा कुलकर्णी यांनी आपल्या आवाजाने उपस्थितांची मने जिंकली. कविवर्य ग्रेस यांच्या गीत कवितांचे सुरेल सादरीकरण मुकुंद फणसळकर यांनी सादर केले.
हे दु:ख कुण्या जन्माचे
क्षितिजाला बिलगून आले
स्वप्नात पुन्हा सापडले
मेघांचे भगवे शेले।
या गीताला भरभरून दाद मिळाली. तसेच रमा कुलकर्णी यांनी बहारदार गीत सादर केले.
कंठात दिशांचे हार
निळा अभिसार
वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ
हे गडे कसे मुलतानी
थंडीतही रसिकश्रोते यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. या वेळी संवादिनीवर आनंद मोडक, तबला संजय पंडित, तर अ‍ॅकॉस्टिक गिटारवर मिहिर भागवत यांनी साथसंगत केली. प्रारंभी अंबाजोगाईच्या तबला अकादमीचे प्रमुख प्रकाश बोरगावकर व त्यांच्या शिष्यांनी तबलावादन केले. गिरधारीलाल भराडिया, दगडू लोमटे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.