कल्याणमधील विक्रीकर कार्यालय हे ग्राहकांना सेवा देण्यापेक्षा व्यापारी, व्यावसायिक यांना लुबाडणे व धमकावण्याचा व्यवसाय करीत आहे. विक्रीकर कार्यालयातील चार अधिकारी हे संगनमत करून व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायातील खोटय़ा तक्रारी दाखवून घाबरून पैसे उकळण्याची कामे करीत आहेत. या कार्यालयातील लाचखोर विक्रीकर उपायुक्त रमेश जैद याच्या आशीर्वादाने हे सर्व उद्योग विक्रीकर कार्यालय बिनधास्तपणे सुरू आहेत. आपणास विक्रीकर आयुक्त नितीन करीर किंवा अजित पवार हेही काही करू शकत नाही, अशी दपरेक्तची भाषा लाचखोर उपायुक्त जैद हा व्यापाऱ्यांसमोर करतो, अशी खळबळजनक तक्रार डोंबिवलीतील युनिक डेव्हलपर्सचे मालक व डोंबिवली जिमखान्याचे अध्यक्ष दीपक मेजारी यांनी विक्रीकर आयुक्त डॉ. नितीन करीर यांच्याकडे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना दिल्या आहेत, असे दीपक मेजारी यांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दीपक मेजारी यांनी कल्याणचा विक्रीकर उपायुक्त रमेश जैद याला त्याच्या साथीदारासह २० लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पकडून दिले आहे. या तक्रारीचा राग मनात धरून गेले काही दिवसांपासून मेजारी यांना अनोळखी मोबाइलवरून शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे.
व्यापारी भीतीने आपल्या सनदी लेखापालामार्फत हे प्रकरण संयमाने सुटेल यासाठी प्रयत्न करत. पण विक्रीकर कार्यालयातील कर्मचारी त्या सनदी लेखापालाकडे आम्हाला आमची बिदागी द्या अशी मागणी करीत. व्यावसायिकाला ते तुम्ही घरदार विका, पैसे उसने घ्या. पण मला पैसे द्या हा एकच हेका कायम ठेवत. व्यापारी, व्यावसायिकांना उत्तम सेवा देण्यासाठी विक्रीकर कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांची बदली करावी व त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दीपक मेजारी यांनी केली आहे.  

चौकडीचा व्यवसाय
कल्याणच्या विक्रीकर कार्यालयात लाचखोर रमेश जैद हा उपायुक्त होता.(आता निलंबित). वसुली अधिकारी सूर्यवंशी, विक्रीकर निरीक्षक कल्पना पवार-राठोड, कारकून आर्चिस विसारिया हे चार कर्मचारी या कार्यालयात काम करतात. कोणीही व्यापारी, व्यावसायिक विक्रीकर कार्यालयात आला की या चौकडीकडून व्यापाऱ्यासमोर विक्रीकर थकवल्याचे मोठय़ा रकमेचे खोटे देयक समोर ठेवते. यासाठी खासगी सनदी लेखापाल व सल्लागार यांची मदत घेतली जाते. हे देयक पाहून व्यापारी चक्रावतो. या खोटय़ा देयकासह सूर्यवंशी, कल्पना व विसारिया हे त्रिकुट व्यापाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून लाचखोर जैद याच्यासमोर उभे करीत असे. लाचखोर जैद हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेल्या व्यापाऱ्याला मी निवृत्त लष्करी अधिकारी आहे. तुम्ही मोठा अजामीनपात्र गुन्हा केला आहे. पंधरा वर्षे तुम्ही तुरुंगात जाल, तुमच्या व्यवसायाची व आयुष्याची मी वाट लावतो, अशी दमबाजी करीत असल्याचे मेजारी यांनी तक्रारीत म्हटले आहे.