सलमानने ‘जय हो’चे पोस्टरही रंगवले

सलमानची चित्रकारिता आणि त्याने काढलेल्या चित्रांनी त्याच्या बॉलिवूडमधील मित्रांचे, सहकाऱ्यांचे सजलेले दिवाणखाने ही नवी गोष्ट नाही.

सलमानची चित्रकारिता आणि त्याने काढलेल्या चित्रांनी त्याच्या बॉलिवूडमधील मित्रांचे, सहकाऱ्यांचे सजलेले दिवाणखाने ही नवी गोष्ट नाही. आता याच चित्रकारितेचा वापर आपल्या चित्रपटांच्या पोस्टरसाठी व्हावा, ही सलमानची इच्छा होती. त्याच्या डोक्यात आलेल्या एका अफलातून कल्पनेला त्याने ‘जय हो’ चित्रपटासाठी मूर्त स्वरूप दिले आहे. ‘जय हो’ चित्रपटाचे पोस्टर सलमानने स्वत: रंगवले आहे.‘जय हो’ चित्रपटाचे पोस्टर्स वेगळे असावेत, असा विचार निर्माता-दिग्दर्शक सोहैल खान याने केला होता. त्यात सलमानने आपली कल्पना त्याच्यासमोर मांडली. सलमानला आपल्या चाहत्यांचाही समावेश या पोस्टरमध्ये व्हावा, असे वाटत होते. त्यामुळे त्याने फेसबुकवर आपल्या चाहत्यांना या पोस्टरचा भाग होण्यासाठी आवाहन केले होते. कित्येकांनी त्यासाठी त्याच्या फेसबुकवर गर्दी केली होती. आपल्या चाहत्यांचे हजारो चेहरे एकात एक मिसळत सलमानचे एक मोठे छायाचित्र करण्यात आले आहे. सलमानने हे पोस्टर स्वत: रंगवले आणि मग ते पूर्ण करण्यासाठी त्याच्या डिजिटल तंत्रज्ञांच्या टीमला देण्यात आले होते. या पोस्टरवर उमटलेली ‘जय हो’ ही अक्षरेही सलमाननेच स्वत: हाताने रंगवलेली आहेत. एक वर्षांच्या गॅपनंतर सलमान पडद्यावर दिसणार ही एक उत्सुकता जशी या चित्रपटामागे आहे तसेच सोहैल खान दिग्दर्शक आणि सलमान अभिनेता ही जोडीही बऱ्याच वर्षांनंतर एकत्र दिसते आहे. त्यामुळे या चित्रपटाची पहिली ओळख प्रेक्षकांसाठी वेगळी असावी, अशी सोहैलचीही इच्छा होती. सलमानने रंगवलेल्या या पोस्टरमुळे सोहैलची ही इच्छा पूर्ण झाली आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि सोहैल खान प्रॉडक्शन्सचा ‘जय हो’ हा चित्रपट २४ जानेवारी २०१४ ला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त ( Ravivar-vruttant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman portraits jai ho poster

Next Story
‘हॅपी जर्नी’मध्ये अतुल कुलकर्णी-प्रिया बापट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी