नागपूर जिल्ह्य़ातील नदी किनाऱ्यांवरून वाळू चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असून शासनाच्या महसुलावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. महसूल खाते वा ग्रामीण पोलीस त्यावर आळा घालण्याचा कसोशीने प्रयत्न करूनही वाळूची चोरी सुरूच आहे.
खापरखेडा परिसरातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पत्रातून वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल खात्याचे पथक चोरटय़ांच्या मागावर निघाले. मंगळवारी सकाळी खापरखेडाजवळील रोहणा ते पोटा दरम्यान कन्हान नदीच्या पात्रात वाळूचे अवैध उत्खनन केल्या गेल्याचे त्यांना आढळले. रोहणा ते पोटा दरम्यान कच्च्या रस्त्याच्या कडेला वाळूचे ढिगारे होते. वाळू ओली असल्याने रात्रभरात ती काढली गेल्याचे स्पष्ट झाले. सुमारे शंभर ग्रास वाळूचे अवैध उत्खनन झाल्याचा अंदाज आहे. या परिसरात वाळू चोरीच्या घटना नव्या नाहीत. काही दिवसांपूर्वी सुमारे ५० ब्रास वाळू चोरी झाल्याचे उघड झाले.
पंधरा दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील पथकाने वलनी वाळू घाटाची पाहणी केली. २३४ ब्रास वाळू चोरी झाल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. या महिनाभरात सुमारे चारशे ब्रास वाळू चोरी झाली असून आठ लाख रुपयांहून अधिक नुकसान शासनाचे झाले आहे. मौदा तालुक्यातही वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल खात्याने अवैध वाळू वाहून नेणारे सहा ट्रक एकाचवेळी पकडले. प्रत्येकी बारा हजार रुपये दंड आठशे रुपये स्वामीत्व शुल्क, असा एकूण प्रत्येकी बारा हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला. ट्रक का सोडण्यात आले, हे ते अधिकारीच जाणोत. रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी सूर नदीच्या पात्रातून वाळू चोरून नेणारे सात ट्रॅक्टर पकडले. याशिवाय चौदाजणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. सूर नदीच्या वाळू घाटाचा अद्याप लिलावही झाला नसताना वाळू चोरून नेली जात होती. नागपूर जिल्ह्य़ातील नदी पात्रातून अवैध वाळू चोरी वा उत्खनन होत असल्याची माहिती असूनही महसूल व ग्रामीण पोलीस गंभीर नाहीत. महसूल व ग्रामीण पोलिसांकरवी अधूनमधून कारवाई केली जाते. तरीही वाळू चोरी सुरूच आहे. वाळू घाटांचा लिलाव आता संगणकाच्या माध्यमातून म्हणजे ई-लिलाव होत आहे. त्याने वाळू चोरीस आळा बसल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जातो. काही अंशी आळा बसला असला तरी शासनाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होतच आहे.
महसूल खाते दंडात्मक कारवाई करून वाहने सोडून देतात. मात्र, पोलीस चालकाला अटक करून वाहने जप्त करतात. पोलीस गंभीरतेने कारवाई करीत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वाळू माफियांना गजाआड करण्याचे आदेश
नागपूर जिल्ह्य़ातील वाढत्या वाळू तस्करीची ग्रामीण पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून वाळू माफियांना गजाआड करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यात नागपूर जिल्ह्य़ात एकूण ५४ गुन्हे दाखल करण्यात आले. १२८ आरोपींना अटक करण्यात आली. एकूण ५ हजार ५३१ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. ५१ लाख ७० हजार रुपयांचा हा ऐवज आहे. वाळू तस्करीसंदर्भात जिल्हाधिकारी सौरभ राव व पोलीस गंभीर असून वाळू तस्करीप्रकरणी स्वत: फिर्यादी होण्याचे आदेश ठाणेदारांना दिले आहेत. वलनी येथील लतीफ नावाच्या आरोपी वाळू माफियास हद्दपार करण्यात आले आहे. आरोपींना गजाआड करून ट्रकसह माल जप्त करण्यात आला आहे. एकंदरित गंभीर कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचे डॉ. शर्मा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.