‘कुठवर पाहू वाट सख्या’ या सुप्रसिध्द लावणीच्या गायिका आणि ज्येष्ठ कलावती गुलाबबाई संगमनेरकर लवकरच िहदी चित्रपटातून संगमनेरकरांच्या भेटीला येत आहे. पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करीत असलेले पानिपतकार विश्वास पाटील यांच्या रज्जो चित्रपटात गुलाबबाई महत्वाची भूमिका साकारत आहेत. त्यांची मुलगी, नात अशा तीन पिढय़ा या चित्रपटातून झळकणार आहेत.
मुळच्या संगमनेरच्या असलेल्या गुलाबबाई सध्या पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. वयाच्या ९ व्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या गुलाबबाई सध्या ८१ व्या वर्षीही तेवढय़ाच ताकदीने अभिनयात रमल्या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील रज्जो नावाचा िहदी चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. सुप्रसिध्द अभिनेत्री कंगणा राणावत, पारस अरोरा, महेश मांजरेकर, प्रकाश राज, उपेंद्र लिमये आदी कलाकारांसमवेत सध्या मुंबईत चित्रीकरण सुरु आहे. कोठय़ावर मुजरा सादर करणाऱ्या रज्जो (कंगणा राणावत) हिच्यासोबत त्या बडी अम्मी अर्थात कोठय़ाच्या मालकीणीची भुमिका गुलाबबाई साकारत आहेत. बोरीवलीमध्ये एका बंगल्यात कामठीपुरा परिसराचा भव्य सेट उभारुन चित्रपटाच्या महत्वाच्या भागाचे चित्रीकरण पुर्ण झाले आहे.
गुलाबबाईंच्या भुमिकेविषयी विश्वास पाटील यांनी सांगितले की, तमाशा, संगीतबारीसारख्या लोकरंगभूमिवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या गुलाबबाईंखेरीज या भूमिकेसाठी मी कोणाचाही विचार करु शकलो नाही. या वयात न कंटाळता त्यांनी या भुमिकेला न्याय दिला आहे. गुलाबबाईंच्या कन्या कल्पना आणि नात पियुषा अशा एकाच कुटूंबातील तीन पिढय़ांनी चित्रपटात एकत्र काम करण्याचा अनोखा प्रयोगदेखील रसिकांना बघायला मिळणार आहे. गुलाबबाईंच्या दृष्टीने चित्रपटातील भूमिका व अभिनय हा नवा अनुभव होता. याबाबत त्या म्हणाल्या की, सत्तर वर्ष राज्यातल्या रसिकांसमोर तमाशाच्या माध्यमातून कला सादर केली. आता देशभरातील रसिकांसमोर जाण्याची संधी मिळाली. येत्या जुनपर्यत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. साहित्य, कलाक्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरच्या कला इतिहासातील ही महत्वपुर्ण बाब असल्याची माहिती लोककलेचे अभ्यासक संतोष खेडलेकर यांनी दिली.