स्वारगेटच्या एसटी स्थानकातून बस पळवून नेऊन शहराच्या रस्त्यावर आठ जणांचा बळी घेणाऱ्या संतोष माने याच्या प्रकरणानंतर स्थानकातील व्यवस्था व सुरक्षेबाबत बरेच काही करण्यात आल्याचा दावा एसटी महामंडळाकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षातील स्थिती दाव्यापेक्षा निराळीच आहे. चालकांचे समुपदेशन, आरोग्य तपासणी, स्थानकातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर सुरक्षा रक्षक व एकूणच स्थानकांच्या सुरक्षिततेबाबत आजही ‘खिळखिळी’च अवस्था असल्याचे चित्र आहे.
स्वारगेट स्थानकातच वाहन असणाऱ्या माने याने मागील वर्षी २५ जानेवारीला सकाळी स्वारगेट स्थानकातून एसटीची एक बस बाहेर काढली. शहरातील रस्त्यांवर बेदरकारपणे ही गाडी चालवित त्याने आठ जणांचा बळी घेतला, तर अनेकांना जखमी केले. या प्रकरणाने शहरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने एसटी महामंडळ खडबडून जागे झाले. एसटी स्थानकांची व्यवस्था व सुरक्षा त्याचप्रमाणे एसटीतील वाहक व चालकांचे आरोग्य, मानसिक स्थिती आदी मुद्दे या घटनेनंतर ऐरणीवर आले.
एसटीची कोणतीही गाडी कुणीही व कधीही बाहेर काढू शकतो, हे या प्रकरणातून स्पष्ट झाल्यानंतर सुरुवातीला स्वारगेटसह शहरातील एसटीच्या इतर स्थानकातून बाहेर पडणाऱ्या गाडय़ांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा ठेवण्यात आली होती. पुणे, शिवाजीनगर, िपपरी- चिंचवड स्थानकातून ही यंत्रणा कधीच गायब झाली. स्थानकातून बाहेर जाणाऱ्या गाडय़ांकडे लक्ष ठेवण्यात येत असल्याचा व त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याचा दावा एसटीच्या प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात स्वारगेट स्थानकातही अशी व्यवस्था सध्या दिसून येत नाही.  
एसटीचे वाहक व चालकांच्या आरोग्य तपासणीबाबत सुरुवातीला गांभीर्याने निर्णय घेण्यात आले. त्यानुसार आरोग्य तपासणीही झाली. मात्र, त्यानंतर या तपासणीतही ढिलाई झाली. चालक व वाहकांवरील ताण लक्षात घेता त्यांच्या समुपदेशनासाठी राज्यभर समुपदेशकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचे पुढे काय झाले किंवा त्यातून नेमके किती वाहक व चालकांचे समुपदेशन झाले, तसेच त्याचा परिणाम नेमका त्यांच्या कामावर कसा झाला, याचे उत्तरही अद्याप प्रशासनाकडे नाही.
सुरक्षेच्या दृष्टीनेही शहरातील एसटी स्थानकांमध्ये कोणतीही ठोस यंत्रणा नसल्याचे दिसून येते. सर्व स्थानकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा मुद्दा अनेक वर्षे रेंगाळत पडलेला आहे. स्थानकात एसटी उभी केल्यानंतर चालक किंवा वाहकाने गाडीत थांबले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, बहुतांश गाडय़ांबाबत तसे होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजही स्थानकातून कोणीही गाडी बाहेर नेऊ शकतो. एसटीच्या बहुतांश गाडय़ा चावीविना चालू होतात. त्याचप्रमाणे अनेक गाडय़ांसाठी एकच चावी वापरली जाते, हा मुद्दाही माने प्रकरणानंतर चर्चेला आला होता. मात्र, सध्या गाडय़ांमध्ये विशेष स्वीच बसविण्यात आला असून, त्यानुसार एसटीच्या गाडय़ा कोणीही सुरू करू शकणार नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
एक कोटीची नुकसान भरपाई
संतोष माने प्रकरणानंतर एसटी महामंडळाने दुर्घटनाग्रस्त लोकांना वर्षभरात एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणातील दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे दावे न्यायप्रविष्ठ आहेत, अशी माहिती एसटीचे विधी सल्लागार अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांनी दिली.